श्रीक्षेत्र भीमाशंकरला हजारो भाविक
By Admin | Updated: August 8, 2016 22:36 IST2016-08-08T20:22:50+5:302016-08-08T22:36:01+5:30
‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे ५० हजार भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यातील

श्रीक्षेत्र भीमाशंकरला हजारो भाविक
संख्या रोडावली : पहिला श्रावणी सोमवार, विविध कार्यक्रमांचे आयोजन
भीमाशंकर - ‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे ५० हजार भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असतानाही भाविकांची संख्या कमी पाहायला मिळाली. सोमवारच्या तुलनेत शनिवार व रविवार या दोन दिवस मोठ्या प्रमाणात भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
सोमवारी भीमाशंकरमध्ये दाट धुके व मुसळधार पाउस पडत होता. अशा वातावरणात भाविक दर्शनरांगेत उभे राहून दर्शन घेत होते. यात्रेपूर्वी झालेल्या नियोजनाप्रमाणे रविवार व सोमवार जादा बस गाड्या व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती. यावर्षी शनिवार, रविवार या सुट्यांंच्या दिवशीही पोलीस हजर असल्यामुळे वाहतूककोंडी झाली नाही. पुण्याहून आलेल्या बाँबशोधक व नाशक पथकानेही सकाळी मंदिर परिसराची तपासणी केली.
भीमाशंकर मंदिरात पोलीस स्थानिक पुजारी व गुरव यांना अरेरावीची भाषा करतात, पोलीस एक दिवस येतात, इतर दिवशी आम्हीच मंदिरातील सुरक्षा पाहत असतो, अशी तक्रार नियोजन बैठकीत विश्वस्तांनी केली होती. या वर्षी पोलिसांनी विश्वस्त व देवस्थानचे सुरक्षारक्षक यांना बरोबर घेऊन बंदोबस्त लावला. त्यामुळे कोणाचीही गैरसोय झाली नाही. दर्शनही व्यवस्थित होत होते.
एसटी महामंडळाने वाहनतळ ते मंदिर अशा वाहतुकीसाठी मिनी बस ठेवल्या होत्या. तसेच श्रावणी सोमवारनिमित्त शिवाजीनगर, राजगुरुनगर, नारायणगाव आदी डेपोंतून जादा गाड्या आल्या होत्या. आरोग्य विभागाचे फिरते आरोग्य पथकही तैनात होते. गर्दी कमी असल्यामुळे हॉटेल, पेढा व्यवसायावर परिणाम दिसला. व्यावसायिकही सोमवारच्या तुलनेत इतर दिवशी चांगला व्यवहार होत असल्याचे म्हणत होते.
वन्यजीव विभाग भीमाशंकरचे वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे यांनी प्लॅस्टिक व कचरा गोळा करण्यासाठी कर्मचारी नेमले होते. वन्यजीव विभागाने प्लॅस्टिक निर्मूलनासाठी ठिकठिकाणी फलक लावले असून कचरापेट्या ठेवल्या होत्या. आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाचे ५० स्वयंसेवक मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम करीत होते. देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त सुरेश कौदरे, तहसीलदार सुनील जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती देसाई यात्रेचे नियोजन करीत होते.
भीमाशंकरकडे दारू पिऊन येणाºया पर्यटकांवर घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर कडक कारवाई करीत आहेत. गेल्या एक महिन्यात दारू पिऊन गाडी चालवणाºयांकडून सुमारे पन्नास हजार रुपये दंड वसूल केला आहे. अनेकांना नोटिसा देऊन कोर्टात पाठविले आहे. त्यामुळे दारू पिऊन धिंगाणा घालणा-या पर्यटकांवर लगाम बसला असून दुचाकीच्या अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे.