‘त्या’ स्फोटकांचे नक्षल कनेक्शन
By Admin | Updated: February 9, 2015 05:51 IST2015-02-09T05:51:19+5:302015-02-09T05:51:19+5:30
महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील पांढुरणे गावातून हस्तगत झालेली स्फोटकांची मोठी खेप नक्षलवाद्यांना पुरविण्यात येणार होती,

‘त्या’ स्फोटकांचे नक्षल कनेक्शन
मुंबई : महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील पांढुरणे गावातून हस्तगत झालेली स्फोटकांची मोठी खेप नक्षलवाद्यांना पुरविण्यात येणार होती, अशी माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या चौकशीतून समोर आली आहे. एटीएसच्या नागपूर युनिटने २ दिवसांपूर्वी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने ही स्फोटके पकडली होती. या प्रकरणी राजस्थानच्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
स्फोटकांची ही मोठी खेप हस्तगत करून एटीएसने नक्षलवाद्यांकडून भविष्यात घडविण्यात येणारे स्फोट रोखल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०च्या सुमारास महाराष्ट्र सीमेवरील मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा, पांढुरणे गावातील एका घरावर छापा घालून नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी १७६८ इलेक्ट्रीक डीटोनेटर्स, केल्वेक्स पॉवर ९० क्लास २ प्रकारातल्या ६१२ कांड्या, ८४० फूट वायर आणि सुरुंग स्फोट घडविण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य हस्तगत केले.
हे घर कुशल विठोबा माडणकर नावाच्या व्यक्तीच्या मालकीचे आहे. त्यामुळे एटीएसने पांढुरणे पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. कुशल यांच्या चौकशीतून मुकेश आणि राजकमल सांकला या दोन राजस्थानी तरुणांची माहिती एटीएसला मिळाली. ते गेल्या काही दिवसांपासून कुशल यांच्या घरी स्फोटकांसह दडून होते, असे समजते. त्यांना एटीएसने भारतीय स्फोटके कायद्यातील कलमांनुसार अटक केली. चौकशीत या दोघांनी याआधीही महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये अशा प्रकारे स्फोटकांचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार एटीएस अधिकारी त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)