पुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त घातपाताची शक्यता वर्तवण्यात आल्याने पुणे लोहमार्ग पोलिसांनी लोणावळा, खडकी, शिवाजीनगर, दौंड, पुणे रेल्वेस्थानकांवर कसून तपासणी केली. यासोबतच चोख बंदोबस्त लावून प्रवाशांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांनी दिली.स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, अतिरिक्त अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वे स्थानक येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून रेल्वे स्थानक व परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार, सर्व प्लॅटफॉर्म, रेल्वे ट्रॅक, उड्डाणपूल, वाहनतळ अशा ठिकाणी घातपातविरोधी तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक संजय सातव, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार घोरपडे, उपनिरीक्षक बबन गायकवाड, मिलिंद कांबळे यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच पुणे शहरामध्येही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून महत्त्वाच्या ठिकाणावर लक्ष ठेवले जात असून एसटी स्टँड, पीएमपी स्टँड, रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच हॉटेल, लॉजेसची तपासणी करण्यात येत आहे. काहीही संशयास्पद आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला अथवा नियंत्रण कक्षाला कळवण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे स्थानकांवर कसून तपासणी
By admin | Updated: August 15, 2016 00:57 IST