राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे सुरू झालं आहे. या अधिवेशनाला अजित पवार पक्षाच्या आमदारांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची अधिवेशनातील उपस्थिती ही लक्षवेधी ठरली होती. दरम्यान, अधिवेशनातील उपस्थितीबाबत छगन भुजबळ यांनी सूचक विधान केलं आहे. पक्षाचं अधिवेशन हे कुण्या एका व्यक्तीचं नाही. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. या विधानामधून छगन भुजबळ यांनी नाव न घेता अजित पवार यांना टोला लगावला असल्याचं बोललं जात आहे.
अधिवेशनातील उपस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले की, हे पक्षाचं शिबीर आहे. कुणाही व्यक्तीचं शिबीर नाही. तसेच अजित पवार यांनी आपल्याशी संपर्क साधलेला नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान, आज सकाळी अधिवेशनाला उपस्थित राहिल्यावर छगन भुजबळ म्हणाले होते की, माझी नाराजी वगैरे दूर झाली, असा काही प्रश्न येत नाही. काल प्रफुल्ल पटेल हे दोन तास येऊन बसले होते. त्यावेळी अधिवेशनाला थोडा वेळ येऊन जा, अशी विनंती त्यांनी केली होती. तसेच आपण कृपा करून अधिवेशनाला यावं, असे फोन सुनील तटकरे यांनीही केले होते. म्हणून मी थोड्या वेळासाठी अधिवेशनामध्ये आलो होतो. तसेच या निमित्तानं साईबाबांचं दर्शनही झालं, असे छगन भुजबळ म्हणाले.