मुंबई : अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे, याचा मला आनंद आहे. इतिहासात एवढे बहुमत महायुतीला कधी मिळाले नव्हते. राज्यातील तमाम जनतेने मतांचा वर्षाव केला आणि ऐतिहाससिक विजय मिळाला, असे प्रतिपादन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सरकार स्थापनेचे पत्र राज्यपालांकडे सादर केल्यानंतर राजभवनवर शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे यांनी यावेळी अभिनंदनही केले.
अडीच वर्षांपूर्वी इथेच फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती, आज फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मी आणि माझ्या पक्षाने शिफारस पत्र दिले, असेही शिंदे म्हणाले.
फडणवीस माझ्याकडे आले त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे असा महायुतीच्या नेत्यांचा आग्रह आहे, त्यांना धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.
पुढेही एकत्रित निर्णय घेऊ : फडणवीस
मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद ही तांत्रिक बाब आहे. आम्ही यापूर्वी तिघेही एकत्र निर्णय घेत आलो आहोत, पुढेही एकत्रित निर्णय घेऊ, असा मला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मी काल संध्याकाळी शिंदेंना विनंती केली शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रिमंडळात राहावे, शिवसेनेची आणि सगळ्या आमदारांचही हीच इच्छा आहे, त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे.
आम्ही एकत्रितपणे चांगले सरकार देण्याचा प्रयत्न करू, विशेषतः जी आश्वासने आम्ही जनतेला दिली आहेत ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही फडणवीस म्हणाले.
‘त्यांचे माहिती नाही, मी मात्र नक्की शपथ घेणार’
अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तुमचे काय असा प्रश्न पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारला, त्यावर संध्याकाळपर्यंत थांबा असे उत्तर शिंदे देत असतानाच मी तर थांबणार नाही, मी उद्या शपथ घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
त्यावर अजित पवारांना सकाळी आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा चांगला अनुभव असल्याचा टोला शिंदेंनी लगावला. त्यावर सकाळचा शपथविधी अर्धवट राहिला, आता पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे अजित पवार यांनी जोरकसपणे सांगितले.
आश्वासनांची पूर्तता करू : अजित पवार
आम्ही सर्वजण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू, आम्हाला अनुभव आहे, सर्व समाजाला त्याचा फायदा कसा करून देता येईल, शेतकऱ्याला संकटातून कसे बाहेर काढता येईल, यासाठी आम्ही काम करू, तसेच निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू, असे अजित पवार यांनी सांगितले.
मी दिल्लीला अमित शाह यांची भेट घ्यायला गेलो नव्हतो, त्यामुळे त्यांनी भेट नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.