तीस टक्के महिलांना स्तनांच्या कर्करोगाचा धोका
By Admin | Updated: February 4, 2015 00:18 IST2015-02-04T00:18:04+5:302015-02-04T00:18:04+5:30
स्पर्धात्मक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व काम करणाऱ्या मंिहला आपल्या आरोग्याकडे मात्र हवे तितके लक्ष देत नसल्याचे चित्र पुण्यात आहे.

तीस टक्के महिलांना स्तनांच्या कर्करोगाचा धोका
राहुल कलाल - पुणे
स्पर्धात्मक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व काम करणाऱ्या मंिहला आपल्या आरोग्याकडे मात्र हवे तितके लक्ष देत नसल्याचे चित्र पुण्यात आहे. शहरातील सुमारे ३० टक्के महिलांना स्तनांच्या कर्करोगाचा धोका असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. याबरोबर स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेटचा कर्करोग होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वाढीचे हे प्रमाण असेच राहिले, तर पुण्याचे आरोग्य पुढील काही वर्षांत खालावेल, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीवरून पुण्यात अजूनही कर्करोगाबाबत व्यापक जनजागृती झालेली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या वर्षभरात हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये दिसून आले, की पुण्यातील सुमारे ३० टक्के महिलांना स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापैकी १० टक्के महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होण्याची लक्षणेही आढळून आली आहेत. गेल्या ५ वर्षांत पुण्यात स्तनांच्या कर्करोगात सुमारे ६ टक्के वाढ होत आहे. ४५ ते ५० वयोगटातील महिलांना स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे.
पुण्यातील सुमारे २० टक्के महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका या सर्वेक्षणातन दिसून आला आहे. हा कर्करोग होण्याचे प्रमाण ३५ ते ४५ वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक आहे. महिलांबरोबर पुरुषांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. शहरातील सुमारे २४ टक्के पुरुषांना प्रोस्टेट कर्करोग होण्याचा धोका आहे. यामध्ये ४५ ते ५० वयोगटातील पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे, ५५ ते ६० वयोगटातील पुरुष प्रोस्टेट कर्करोगाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते उपचारासाठी जात असल्याने आजाराचा गुंता वाढल्याचे दिसून येत आहे.
तरूणाईला वेढा कर्करोगाचा
४प्रामुख्याने वयाच्या चाळीशीनंतर दिसून येणारा कर्करोग आता तरूणांनाही आपले शिकार बनवू लागला आहे. वयाची तिशीही उलटलेल्या नसलेल्या तरूणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. यामध्ये फुफ्फुसांचा आणि तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
४तरूणाईची व्यसनाधीनता यासाठी कारणीभूत आहे. धूम्रपान, गुटखा, पानमसाल्याच्या सततच्या खाण्यामुळे हा कर्करोग तरूणाईला ग्रहण लावत आहे.
४तंबाखू, गुटखा खाण्याऱ्यांपैकी सुमारे १८ टक्के पुरूष व महिलांना तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका आहे. यामध्ये ग्रामीण भागातील तरूणाईचे प्रमाण अधिक आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढले आहे.
घातक अन्नामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका
४पुण्यात हॉटेलिंग करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबरोबर बाहेरचे हातगाड्यांवरील अन्न खाण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहेत. अर्धवट शिजवलेल्या अन्नामुळे पुण्यातील सुमारे १५ टक्के नागरिकांना पोटाचा कर्करोग होण्याचा धोका आहे.
महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण दर वर्षी ३ ते ५ टक्क्यांनी वाढत चालले आहे. ही धोक्याची घंटा आहे. महानगरांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. २२ महिलांमागे एका महिलेला स्तनांचा कर्करोग झाल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही या आजाराबाबत अजूनही हवी तेवढी जनजागृती झालेली नाही. यामुळे आजार खूप बळावल्यानंतर रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. हा आजार पहिल्या टप्प्यातच लक्षात आला आणि त्यावर उपचार केले, तर तो पूर्णपणे बरा होणारा आहे. महिलांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. सी. कोप्पीकर,
ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ
पुरूषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्या तुलनेत जनजागृतीही वाढत असल्याचे चित्र आहे. अगोदर प्रोस्ट्रेट कर्करोग झाल्याच्या खूप दिवसांनंतर रुग्ण उपचारासाठी येत होते. मात्र, जनजागृतीमुळे पहिल्या टप्प्यातच रुग्ण तपासणीद्वारा उपचारासाठी येत आहेत. यामुळे कोणतीही शस्त्रक्रिया न करता आणि अत्याधुनिक उपचार देऊन रुग्णांना बरे करण्याचे प्रमाणही वाढले आहे.
- डॉ. मनीष जैन,
ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ