CoronaVirus in Maharashtra: डिसेंबरमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका... घाबरू नका, पण काळजी घ्या; राजेश टोपेंचं महत्त्वाचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:16 IST2021-11-24T16:23:23+5:302021-11-24T17:16:19+5:30
CoronaVirus in Maharashtra: आरोग्य मंत्री राजेश टोपेंकडून सतर्कतेचा इशारा; राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका

CoronaVirus in Maharashtra: डिसेंबरमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका... घाबरू नका, पण काळजी घ्या; राजेश टोपेंचं महत्त्वाचं आवाहन
मुंबई: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर ओसरली. त्यानंतर कोरोना रुग्णाची संख्या कमी होऊ लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानं अनेक जण बेफिकीरीनं वागू लागले. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. डिसेंबरमध्ये राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. मात्र या लाटेची तीव्रता कमी असू शकते. लोकांनी घाबरू नये. मात्र काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं आहे.
राज्यात डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट डिसेंबरमध्ये येऊ शकते. मात्र तिची तीव्रता जास्त नसेल. राज्यातील लसीकरणाचा वेग चांगला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता फारशी नसेल, असं आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपेंनी म्हटलं. कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर २०२० मध्ये, तर दुसरी लाट एप्रिल २०२१ मध्ये आली होती.
राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात लसीकरणानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आधीच्या तुलनेत संक्रमणाचा वेग कमी आहे. मृत्यूदर जवळपास शून्याच्या जवळ आहे. मात्र डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. मात्र लसीकरणाचा वेग चांगला असल्यानं प्रादुर्भाव फारसा नसेल. या कालावधीत आयसीयू आणि ऑक्सिजनची आवश्यकतादेखील कमी भासेल, असं टोपेंनी सांगितलं.
राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के आहे. हा दर देशात सर्वाधिक आहे. सध्याच्या घडीला राज्यात ९ हजार ६७८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी आकडेवारी टोपेंनी सांगितली. राज्यात लसींची कमतरता नाही. आमच्याकडे पुरेशा प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध आहेत. सध्या १.७७ कोटी डोस शिल्लक असून त्यात कोविशील्डच्या १.१३ कोटी डोसचा आणि कोवॅक्सिनच्या ६४ लाख डोसचा समावेश आहे.