तिसरा हत्ती नजरेच्या टप्प्यात
By Admin | Updated: February 12, 2015 00:35 IST2015-02-11T23:02:35+5:302015-02-12T00:35:19+5:30
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : मुख्य वनसंरक्षकांची उपस्थिती, रात्री ९.३0 ला मिशन फत्ते

तिसरा हत्ती नजरेच्या टप्प्यात
विजय पालकर -माणगाव -निवजेच्या जंगलात बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या हत्तीलाही जेरबंद करण्यात यश मिळाल्यानंतर या मोहिमेच्या पथकाने तिसऱ्या हत्तीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. ही मोहीम आता शुक्रवारी राबविण्यात येणार आहे. दरम्यान, निवजेत दुसरा हत्तीही जेरबंद केल्याची बातमी माणगाव खोऱ्यात पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने निवजेच्या दिशेने येण्याची शक्यता लक्षात घेवून वनविभागाच्या विनंतीनुसार कुडाळच्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला.
मोहिमेच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी दोन हत्ती पकडण्यात आल्याने कर्नाटकातून आलेल्या पथकाचे हे मोठे यश मानले जात आहे. दुसऱ्या हत्तीला डॉट मारण्याचे श्रेय डॉ. व्यंकटेश यांना मिळाले. या हत्तीला रात्री साडे नऊ वाजता आंबेरी तळावर चार प्रशिक्षित हत्तींच्या सहाय्याने सात किलोमीटर अंतर चालवत आणून खास तयार करण्यात आलेल्या स्क्रोलमध्ये बंदिस्त करण्यात पथकाला यश मिळाले.
मंगळवारी दिवसभर ही मोहीम थांबविण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता पुन्हा डॉ. उमाशंकर यांनी मोहीम हाती घेतली आणि अवघ्या पाच तासात दुसऱ्या रानटी हत्तीला निवजेच्या जंगलात जेरबंद करण्यात यश मिळविले.
हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी खास कर्नाटकातून चार प्रशिक्षित हत्तींसह २४ कर्मचारी चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. या प्रशिक्षित हत्तींनी सोमवारी रानटी हत्ती पकड मोहीम राबवली. १७ तासानंतर नानेलीच्या जंगलातून एक हत्ती पकडण्यात यश आले. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत ही मोहीम चालल्यानंतर मंगळवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली होती आणि प्रशिक्षित हत्तींनाही विश्रांती देण्यात आली होती.
आज, बुधवारी सकाळी पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली तेव्हा डॉ. उमाशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. व्यंकटेश यांच्यासह चार हत्ती व कर्मचारी आंबेरी येथील तळावरून निवजेच्या जंगलाकडे रवाना झाले. दुसरा हत्ती निवजेच्या जंगलात असल्याचे पथकाच्या लक्षात आले. हा हत्ती पथकाच्या नजरेत येत होता, पण डॉट मारण्यात पथकाला यश येत नव्हते. मात्र, दुपारनंतर डॉ. उमाशंकर यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांसह मोहीम हाती घेतली आणि त्यात त्यांना यश आले आणि दुसऱ्या हत्तीचाही पथकाला सुगावा लागला आहे.
डॉ. उमाशंकर यांच्यासह डॉ. व्यंकटेश यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत स्थानिक वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना सावध करीत हत्तीला चारही बाजंूनी वेढले. त्यानंतर दुपारी ३.४५ वाजता या हत्तीला डॉ. व्यंकटेश यांनी निवजे वझरवाडी येथील चिरेखाणच्या जंगलात औषधी डॉट मारला. डॉटमुळे हत्ती बेशुद्ध पडला असून, त्याला सायंकाळी ५.४५ वाजता साखळदंडाने जखडण्यात आले.
हत्तीला डॉट लागताच कर्नाटकातील पथकाची दुसरा हत्ती जेरबंद करण्याची मोहीम यशस्वी झाली. पण जंगल मोठे असल्याने, तसेच अरुंद रस्त्यांमुळे निवजेच्या जंगलातून त्याला बाहेर काढण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. यामुळे कर्नाटकातील पथकाने हत्तीला चार प्रशिक्षित हत्तींच्या सहाय्याने निवजेच्या जंगलातून सात किलोमीटर अंतर चालवत आणून आंबेरी येथील तळावर आणण्यात यश मिळविले. त्यानंतर तळावर तयार करण्यात आलेल्या स्क्रोलमध्येही या हत्तीला बंदिस्त करण्यात रात्री साडेनऊ वाजता या पथकाला यश आले.
पोलीस फौजफाटा दाखल
निवजेत दुसरा हत्तीही जेरबंद केल्याची बातमी माणगाव खोऱ्यात पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने निवजेच्या दिशेने येण्याची शक्यता होती. त्यामुळे वनविभागाच्या विनंतीनुसार कुडाळचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शना खाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दुसरा डॉट डॉ. व्यंकटेश यांनीच मारला
निवजेच्या जंगलात रानटी हत्ती डॉ. उमाशंकर व डॉ. व्यंकटेश यांच्या नजरेत आल्यानंतर दुपारपर्यंत हा हत्ती कुणाला दिसणार आणि कोण डॉट मारणार, याबाबत उत्सुकता होती. मात्र, सायंकाही पावणेचारच्या सुमारास डॉ. व्यंकटेश यांनीच हत्तीला डॉट मारत उत्सुकता संपवली. मात्र, डॉ. उमाशंकर यांच्या सहकाऱ्यामुळेच हे त्यांना शक्य झाले, हेही महत्त्वाचे आहे.
ग्रामस्थात उत्सुकता कायम
माणगाव खोऱ्यात चार वर्षांनंतर पुन्हा हत्ती पकड मोहीम राबवण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी पथकाच्या मागून मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या पथकाने आपल्या कार्यक्रमात वेळोवेळी बदल करून, ग्रामस्थांना अंधारात ठेवत ही मोहीम फत्ते केली.
दुसऱ्या हत्तीचे वय ३० वर्षे
पहिला जेरबंद झालेला हत्ती ४० वर्षांचा असून, तो मोठा टस्कर असल्याचे पथकातील डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. तर बुधवारी पकडलेला हत्ती ३० वर्षांचा असून त्यापेक्षा लहान आहे. मात्र, माणगाव खोऱ्यात तिसरा हत्ती अजून मोकाट असून, तो मादी हत्ती असावा, असा अंदाज आहे.
‘वरातीमागून घोडे’
राज्यातील हत्ती पकड मोहीम सिंधुदुर्गमध्ये राबवण्यात येत असलेली पहिली मोहीम आहे. यासाठी वैद्यकीय पथक सज्ज असणे गरजेचे होते. पण हत्ती मोहीम सुरू असताना सिंधुदुर्गचे वैद्यकीय पथक मात्र ‘वरातीमागून घोडे’ नाचवत होते. केवळ एक रुग्णवाहिका, त्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी, अशी अवस्था असल्याने हे वैद्यकीय पथक सर्वांच्याच टिकेचे धनी झाले. प्रशिक्षित हत्तींना निवजे येथून आंबेरी येथे हलवायचे असल्याने यापूर्वी हत्तींची झालेली दमछाक आणि त्यातच येथील अरुंद रस्ते, यावर उपाय म्हणून कर्नाटक पथक आणि सिंधुदुर्ग वन विभागाने हत्तींना ट्रकमधूनच आणण्याचे निश्चित केले होते, मात्र दुसरा हत्ती वयाने लहान असल्यामुळे आणि सायंकाळी साडेपाच वाजताच तो जेरबंद झाल्यामुळे त्याला चालवतच आंबेरी येथील तळावर आणण्यात यश मिळाले.
हत्ती पकड मोहीम यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार ५४ लाख रुपये देणार आहे.
जिल्हा नियोजनमधून वन विभागाला या मोहिमेसाठी १५ लाख रूपये मिळणार होते. पण आतापर्यंत राज्य व केंद्र सरकारचे पैसे वन विभागाकडे पोहोचले नसून, ही मोहीम जिल्हा नियोजनाच्या १५ लाखांवरच सुरू आहे. याबाबत कोणताही अधिकारी अधिकृतरित्या बोलण्यास तयार नाही. मात्र, आंबेरीत सुविधांची वाणवा या कर्मचाऱ्यांना जाणवत असल्याचे दिसून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक डॉ. एन.के. राव यांनीही या मोहिमेदरम्यान निवजेच्या जंगलात ठिय्या मारुन वनविभागाच्या पथकाला प्रोत्साहन दिले. डॉ. राव दुपारी या परिसरात आले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविली गेली. त्यांच्या उपस्थितीमुळे पथकामध्ये चैतन्य पसरले होते.
मोहिमेचे आजचे ते पाच तास
सकाळी १0 : पुन्हा डॉ. उमाशंकर यांनी मोहीम सुरु केली.
डॉ. व्यंकटेश यांच्यासह चार हत्ती व कर्मचारी आंबेरी येथील तळावरून निवजेच्या जंगलाकडे रवाना
दुपारी ३.४५ : दुसऱ्या हत्तीला डॉ. व्यंकटेश यांनी निवजे वझरवाडी येथील चिरेखाणच्या जंगलात औषधी डॉट मारला. डॉटमुळे हत्ती बेशुध्द पडला.
सांयकाळी ५.४५ : साखळदंडाने जखडण्यात आले.
रात्री ९.३0 : आंबेरी येथील तळावरील स्क्रोलमध्ये पकडलेल्या हत्तीला बंदिस्त करण्यात पथकाला यश.