पहिल्याच दिवशी मिळणार तिसरी व चौथीची पुस्तके
By Admin | Updated: June 15, 2014 02:42 IST2014-06-15T02:42:11+5:302014-06-15T02:42:11+5:30
शाळा सुरू होण्यापूर्वीच तिसरी आणि चौथीची नवीन पुस्तके शाळेत उपलब्ध होतील. गुजराती, कन्नड, तेलगू आदी विषयांतील पुस्तके मात्र २० जूनपर्यंत मिळतील

पहिल्याच दिवशी मिळणार तिसरी व चौथीची पुस्तके
मुंबई : शाळा सुरू होण्यापूर्वीच तिसरी आणि चौथीची नवीन पुस्तके शाळेत उपलब्ध होतील. गुजराती, कन्नड, तेलगू आदी विषयांतील पुस्तके मात्र २० जूनपर्यंत मिळतील, अशी माहिती राज्यमंत्री फौजिया खान यांनी आज विधान परिषदेत दिली.
राज्यात तिसरीसाठी ५८ लाख ७ हजार २१५ पुस्तकांची मागणी असून, आत्तापर्यंत ५१ लाख ५७ हजारहून अधिक पुस्तकांचा पुरवठा झालेला आहे. तर चौथीच्या ६३ लाख ९५ हजार ८२५ पुस्तकांचा पुरवठा झालेला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आमदार रामनाथ मोते यांनी माध्यमिक विभागातील वाढीव पदांना मान्यता मिळत नसल्यासंदर्भात लक्षवेधी मांडली. राज्यात माध्यमिक शाळांमध्ये १ हजार ७०३ शिक्षक हे वाढीव पदांवरील काम करत आहेत, त्यांच्या पदांना मान्यता कधी देणार, असा सवालही मोते यांनी उपस्थित केला होता. यावर राज्यमंत्री खान यांनी वाढीव पदांपैकी ९१८ पदे ही शिक्षकांची आणि ७२५ पदे ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची असून, यांच्या पदांना मान्यता देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)