मी रामकृष्ण हरी वाली, फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते, खरे बोलते... मी त्यांच्यासारखे खोटे बोलत नाही आणि खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? एवढेच नाही तर, आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातोय आणि आपल्या पैशाने खातोय, दुसऱ्याचं काही उधार नाही. जे आहे ते आहे. आपण कुणाला मिंदे नाही. जे आहे ते डंके की चोट पे. खातो तर खातो, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आता, भजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही त्यांच्यावर हल्ला चढवला आहे.
सोशील मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत उपाध्ये यांनी लिहिले, "जेवणेंही नाम घेऊनी करावें, परि करु नये जीव हिंसा" असे संत तुकाराम महाराज सांगतात…" याचा अर्थ विशद करत त्यांनी लिहिले, "भगवंताचे नाव घेऊन जेवण करावे, हिंसा करून, कुणाला मारून खाऊ नये. असा संस्कार देणाऱ्या तुकोबारायांच्या मराठमोळ्या महाराष्ट्रात सोयीचा विठ्ठल आणि सोयीच्या विठ्ठलभक्तीचे समर्थन करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली आहे."
उपाध्ये यांनी पुढे लिहिले, "विठ्ठलभक्त वारकरी आणि त्यांच्या कुटुंबातील माळकरी कधीच मांसाहारकडे वळत नाहीत. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतानाच, मांसाहार वर्ज्य करण्याचे व्रत सुरू होते आणि रोज हरिपाठाचा परिपाठ सुरू होतो. हिंसा करणार नाही, दारू पिणार नाही, दिंडी सहभाग सात्विक आहार व उपवास असे पंच नियम पाळून माळ धारण करतात, आणि पिढ्यानपिढ्या ही माळ जपली जाते… यानंतर त्यांनी "ऐका_सुप्रियाताई" असा हॅशटॅगही दिला आहे.