कुंभमेळ्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही
By Admin | Updated: December 16, 2014 02:27 IST2014-12-16T02:27:34+5:302014-12-16T02:27:34+5:30
२०१५-१६ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ््याच्या आयोजनासाठी आर्थिक निधीची अजिबात कमतरता भासणार नाही

कुंभमेळ्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही
नागपूर : २०१५-१६ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ््याच्या आयोजनासाठी आर्थिक निधीची अजिबात कमतरता भासणार नाही असे आश्वासन राज्य शासनामार्फत विधानपरिषदेत देण्यात आले. कुंभमेळ्याशी निगडित कामे वेळेअगोदर पूर्ण करण्यात येतील असा दावादेखील करण्यात आला. डॉ.अपूर्व हिरे व जयवंतराव जाधव यांनी या मुद्यावरील लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले.
कुंभमेळ््याच्या आयोजनासाठी नेमलेल्या शिखर समितीच्या बैठकीत २ हजार ३७८ कोटी रुपयांच्या रकमेच्या कामांना तत्वत: मंजूरी देण्यात आली. यानुसार महाराष्ट्र शासनातर्फे आतापर्यंत ८८३ कोटी २१ लाख, केंद्र शासनाकडून ३४ कोटी ७६ लाख व नाशिक महानगरपालिकेकडून ७१ कोटी ७ लाख असा एकूण ९८९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे अशी माहिती शासनातर्फे सामान्य प्रशासन राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी दिली.
या आराखड्यात एकूण २२ यंत्रणांचा समावेश असून ३१५ कामे करण्यात येणार आहेत. यातील १६५ कामे प्रगतिपथावर असून ४८ कामे निविदा प्रक्रियेत आहेत. १०२ कामांना अजून सुरुवातच झालेली नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. नाशिक महानगरपालिकेने वाढीव निधीची मागणी केली असून मु्ख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उच्चस्तरीय समितीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल. शिवाय केंद्र शासनाकडून निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे असेदेखील ते म्हणाले. (प्रतिनिधी)