अतिरिक्त शिक्षकांची नोकरी जाणार नाही

By Admin | Updated: December 5, 2014 00:49 IST2014-12-05T00:41:28+5:302014-12-05T00:49:34+5:30

विनोद तावडे: विद्यापीठाला सुवर्णमहोत्सवी निधी देणारच

There will be no job for additional teachers | अतिरिक्त शिक्षकांची नोकरी जाणार नाही

अतिरिक्त शिक्षकांची नोकरी जाणार नाही

अतिरिक्त शिक्षकांची नोकरी जाणार नाही विनोद तावडे : विद्यापीठाला सुवर्णमहोत्सवी निधी देणारच कोल्हापूर : अतिरिक्त ठरलेल्या कोणत्याही शिक्षकाची नोकरी जाणार नाही. त्यांच्यासह शिक्षण सेवकांची नोकरीदेखील कायम राहील, असे काम सरकारने केले आहे. त्यामुळे शिक्षकांनी निर्धास्त राहावे. समायोजनात काही संस्थाचालकांकडून होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज, गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री तावडे यांनी शिवाजी विद्यापीठात पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री तावडे म्हणाले, समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या ५० हजार जणांची नोकरी जाईल आणि २५ हजार जणांना वेतन मिळणार नाही, असे वातावरण निर्माण केले आहे. मात्र, वास्तव तसे नाही. याबाबतच्या १२ हजार प्रकरणे असून त्यांची माहिती घेतली आहे. अतिरिक्त होणाऱ्या एकाही शिक्षकाची नोकरी जाणार नाही. कोणत्याही शिक्षकाला सध्या आॅफलाईन वेतन मिळत असेल, तर ते लवकर आॅनलाईनवर आणले जाईल. संचमान्यता लवकर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाजी विद्यापीठाला तत्कालीन सरकारने जाहीर केलेला सुवर्णमहोत्सवी निधी दिला जाईल. मागील सरकारने राजकीय प्रसिद्धीसाठी तिजोरीचा विचार न करताच विविध शैक्षणिक योजना, सवलत जाहीर केल्या पण, त्या बंद केल्या जाणार नाहीत. सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या देय रकमेबाबतचा प्रस्ताव निवृत्तीपूर्वी सहा महिने आधीच पूर्ण करण्याचे काम शिक्षण विभाग करेल. महाविद्यालयीन निवडणुकांबाबत विद्यार्थी संघटना सकारात्मक, तर हिंसेच्या भीतीने संस्थाचालक, प्राचार्य नकार देत आहेत. मात्र, विद्यार्थी नेतृत्व विकासासाठी पुढील वर्षीपासून निवडणुका घेण्याचा विचार सुरू आहे. मनमानी शुल्क आकारणीला लगाम घालण्यासाठी शुल्क नियंत्रण कायद्याची अधिसूचना लागू केली आहे. राज्यात ९२ टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत पण, ती सुरू आहेत का? याचा आढावा घेणार आहे. स्वच्छतागृहाअभावी शालेय शिक्षणांतील मुलींच्या ‘ड्रॉप आऊट’चे प्रमाण अधिक आहे. ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाची जबाबदारी घेण्यासह दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाईल. राज्यासाठी स्वतंत्रपणे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा स्वतंत्रपणे करणार आहे. यावेळी आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा संघटक बाबा देसाई, केरबा चौगुले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्रिपद मला मिळाले नसते का? शिवसेनेला द्यावे लागते म्हणून उपमुख्यमंत्रिपद निर्माण करत नाही का? असे विचारले असता त्यावर उपमुख्यमंत्रिपद असते, तर ते मला मिळाले नसते का? असा उलट सवाल करत मंत्री तावडे म्हणाले, उपमुख्यमंत्रिपद हे घटनात्मक नाही. शिवाय एकाच मंत्रिमंडळात दोन सत्ताकेंद्र नकोत म्हणून ते पद टाळले आहे. घटक पक्षांचा विचार अधिवेशनानंतरच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार केला जाणार आहे. शिवाजी विद्यापीठाचा प्रलंबित असलेला सुवर्णमहोत्सवी निधी, रखडलेला रोडमॅप अशा विविध प्रलंबित प्रश्नांना ‘लोकमत’ने सातत्याने वाचा फोडली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विद्यापीठाचे दुखणं एका दृष्टिक्षेपात समजावे, यासाठी विद्यापीठाच्या काही घटकांनी त्यांच्यासमोर ‘लोकमत’चे अंक सादर केले. त्यांनी ‘लोकमत’ वाचून विभागप्रमुखांच्या बैठकीची सुरुवात केली. शेजारी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार उपस्थित होते. प्रवेशक्षमतेची अट रद्द करा : संस्थाचालक कोल्हापूर : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता महाविद्यालयांना घातलेली प्रवेशक्षमतेची अट रद्द करा. पाच वर्षांच्या कालावधीसाठीच्या प्राचार्यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत बदल करा, अशा मागण्या संस्थाचालक आणि प्राचार्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात महाविद्यालयीन संस्थाचालक व शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेशी मंत्री तावडे यांनी चर्चा केली. यात महाविद्यालयांना घातलेल्या प्रवेशक्षमतेच्या अटींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांकडील विद्यार्थ्यांचा कल दरवर्षी कमी-अधिक होतो. अशावेळी प्रवेशक्षमतेच्या अटीमुळे त्यांच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर होतो. ते टाळण्यासाठी संबंधित अट रद्द करावी. प्राचार्य नियुक्तीसाठी दर पाच वर्षांनी मुलाखती घेण्याचा नियम आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांना प्राचार्य मिळत नाहीत. महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांचा घरफाळा आकारणी, व्यावसायिक दराने वीजबिलांची आकारणी रद्द करावी, अशा मागण्या प्राचार्य, संस्थाचालकांनी मांडल्या. त्यावर मंत्री तावडे यांनी याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी संस्थाचालक प्रताप माने, चंद्रकांत बोंद्रे, प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, डॉ. डी. आर. मोरे, शुभांगी गावडे, मेघा गुळवणी, डी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) विद्यार्थी चळवळ सुरू ठेवा विद्यार्थी संघटना व विद्यापीठ कल्याण मंडळाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मंत्री तावडे यांनी कोणावर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. कोणत्या संघटनेवर पोस्टर लावल्याबद्दल तक्रारी आहेत, अशी विचारणा केली. शिवाय या सर्व गोष्टी विद्यार्थिदशेत झाल्याच पाहिजेत. विद्यार्थी चळवळ सुरू ठेवा, असे सांगत त्यांनी महाविद्यालयीन निवडणुकांबाबत मते जाणून घेतली. शिक्षणमंत्र्यांनी घेतली शिक्षकांचीच ‘शाळा’ कोल्हापूर : शिक्षण संस्थाचालकांनी स्वत:च्या कामासाठी संस्थेमधील कर्मचाऱ्यांचा वापर करू नये. संस्थेचे कर्मचारी हे संस्थेच्या कामासाठी असतात. ‘पाणी आण रे’ अशी व्यक्तिगत कामे सांगू नका, अशा कानपिचक्या देत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज, गुरुवारी शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांची शाळा घेतली. आमचे प्रश्न ‘लाइट’ली घेऊ नका, असे एका ज्येष्ठ शिक्षकाने म्हणताच मंत्री तावडे यांनी उपस्थितांना चांगलेच खडे बोल सुनावले. शिवाजी विद्यापीठातील सिनेट हॉलमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे, मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी आयोजित बैठकीत ते बोलत होते. तावडे म्हणाले, ‘जनतेच्या पैशावर तुम्ही संस्था चालवीत आहात, याचे भान ठेवा. तुम्ही चालविलेला गैरकारभार प्रथम बंद करा. शिक्षकांनीही उपकार म्हणून आपण विद्यार्थ्यांना शिकवितो, ही मानसिकता बदलावी. काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या शिक्षणसंस्था नोकरभरती किंवा अन्य कारणास्तव पैसे घेतात. मात्र, यामुळे सर्वच शिक्षणसंस्थांना बदनामीला सामोरे जावे लागते. त्यासाठी असा व्यवहार आम्ही खपवून घेणार नाही.’ जिल्हा व विभागीय प्रश्नांसाठी तुम्हाला थेट शिक्षणमंत्र्यांकडे आता तक्रार करावी लागणार नाही. ते प्रश्न त्या ठिकाणीच सोडविण्याच्या पद्धतीचे प्रशासन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिक्षणक्षेत्रातील संघटनांनीसुद्धा आपले हेवेदेवे बाजूला ठेवून काम केल्यास प्रश्न सुटण्यास मदत होईल. तुमच्या प्रश्नांबाबत विभागवार बैठक घेत आहे. त्यामधून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहीन. दरम्यान, बैठकीत एक ज्येष्ठ शिक्षक एकच प्रश्न विचारत होते. यावर तावडे यांनी मी या प्रश्नांचा अभ्यास केला आहे. हा सोडून दुसरा काही प्रश्न आहे का? असे विचारले. बैठकीस ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळोखे यांच्यासह विविध संस्थाचालक व संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त काम बैठकीत शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त अतिरिक्त कामे सांगू नका, अशी सूचना अनेक शिक्षक करीत होते. यावेळी ‘मी जरी शिक्षणमंत्री असलो तरी मराठा आरक्षणाचे काम करतोच; त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त काम करावे लागतेच,’ असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

Web Title: There will be no job for additional teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.