भिवंडी : कोणतीही गोष्ट सकारात्मक विचारातून केल्याने ती नक्कीच यशस्वी होते. त्यासाठी समाजात स्पर्धा असावी; पण ती सकारात्मक दृष्टिकोनातून हवी, ती द्वेषाची नसावी. द्वेषाची स्पर्धा विनाशाकडे घेऊन जाते. यासाठी कुटुंबात सर्वांनी एकोपा टिकवला पाहिजे, असे आवाहन वनमंत्री गणेश नाईक यांनी केले.
भिवंडी येथे आगरी समाज उन्नती मंडळाच्या वतीने राहनाळ चरणी पाडा येथे उभारलेल्या किशोर आर. सी. पाटील आगरी भवन इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी रविवारी ते बोलत होते. पुरुषोत्तम मनीबाई मोरेश्वर पाटील खुले रंगमंच, भगवान भोईर व मधुकर भोईर सभागृह तसेच द्वारकाबाई रामा पाटील सभागृह असे नामकरण केलेल्या वास्तूंचे लोकार्पण कपिल पाटील व आर. सी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य माजी अध्यक्ष आर. सी. पाटील, खा. सुरेश म्हात्रे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खा. सुरेश टावरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे उपस्थित होते.
गुन्हेगारी कमी झाली म्हणून... समाजासाठी सुरू केलेल्या या कामानंतर धर्मादाय रुग्णालयासाठी आता प्रयत्न करा. पूर्वी ठाणे जेल आगरी समाजाने भरलेले असायचे म्हणून आधारवाडी जेल निर्माण झाले.
आता आगरी तरुण गुन्हेगारीतून मुक्त झाला आहे. गुन्हेगारी कमी झाली म्हणून आज आगरी समाज विकासाकडे वाटचाल करत असला तरी समाजातील काही चालीरिती, रूढी बदलण्याची गरज असल्याचेही नाईक यांनी नमूद केले.