निर्णय झाल्याशिवाय माघार नाही
By Admin | Updated: July 5, 2014 04:40 IST2014-07-05T04:40:19+5:302014-07-05T04:40:19+5:30
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) मान्य झालेल्या पाच मागण्यांवर मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाल्याशिवाय काम बंद आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे

निर्णय झाल्याशिवाय माघार नाही
मुंबई : गेली चार वर्षे आपल्या मागण्यांसाठी विविध प्रकारे प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) मान्य झालेल्या पाच मागण्यांवर मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाल्याशिवाय काम बंद आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आठ हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आमच्याकडे राजीनामे जमा केले आहेत, अजूनही राज्यभरातून राजीनामे येत असल्याची माहिती मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली.
जून महिन्यात मॅग्मो संघटनेने चार दिवस काम बंद आंदोलन पुकारल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पाच मागण्या मान्य केल्या होत्या. पुढच्या दहा दिवसांमध्ये या मागण्यांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र एक महिना उलटला तरीही मागण्या मान्य न झाल्याने १ जुलैपासून मॅग्मो संघटनेतील सुमारे १२ हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. यामुळे राज्यभरातील आरोग्यसेवेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. संपाच्या चौथ्या दिवशी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाच्या सचिव सुजाता सौनिक यांनी मॅग्मोच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. सौनिक यांच्याशी एक तासभर चर्चा झाली. ‘आधी तुम्ही काम बंद आंदोलन मागे घ्या, मग मागण्या मान्य होतील’, असे अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र अधिकारी त्यासाठी तयार न झाल्याने चर्चा निष्फळ ठरली. (प्रतिनिधी)