CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनमुळे नेमकं काय होतं; तज्ज्ञांच्या स्पष्टीकरणानं चिंता आणखी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 06:52 IST2021-04-04T03:09:24+5:302021-04-04T06:52:39+5:30
तज्ज्ञांचे स्पष्टीकरण; टाळेबंदी कशासाठी लादतात कोण जाणे!

CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनमुळे नेमकं काय होतं; तज्ज्ञांच्या स्पष्टीकरणानं चिंता आणखी वाढली
पुणे : गेल्या वर्षीच्या टाळेबंदीचा उपयोग कोरोना प्रसार रोखण्यासाठी कितपत झाला, याबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. टाळेबंदी आणि कोरोना संसर्ग रोखणे यांचा परस्पर संबंध स्पष्ट करण्यास शास्त्रीय आधार नाही किंवा याचा अभ्यासही झालेला नाही. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्याचे सांगत लादलेली टाळेबंदी अशास्त्रीय आणि अतार्किक असल्याचा सूर तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षी २४ मार्च रोजी देशभर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या कालावधीचा उपयोग हा प्रामुख्याने वैद्यकीय यंत्रणा तत्पर करण्यासाठी झाला. टाळेबंदीमुळे कोरोना संसर्गाची साखळीच तुटली हे सिद्ध करणारा अभ्यास झालेला नाही. तब्बल वर्षभरानंतरही पुन्हा टाळेबंदीचा निर्णय राज्य सरकारने का घेतला आहे, हा प्रश्न तज्ज्ञांनाही पडला आहे.
कोरोनाचा प्रसार फक्त संध्याकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेतच होतो आणि एरवी तो होत नाही, असे सरकारला वाटते का, अशा उद्विग्न प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी गेल्यावर्ष पहिल्यांदा २१ दिवसांची टाळेबंदी लागली, त्या वेळेचा उपयोग देशात आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी झाला. वर्षभरानंतरही समाज जबाबदारीने वागत नसल्याने धाक निर्माण करण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असावेत.”
- डॉ. अरविंद देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
भारतात टाळेबंदीचा उपयोग नाही
लॉकडाऊनला कोणताही शास्त्रीय आधार नाही. टाळेबंदीमुळे संसर्गाची साखळी तुटते, असा पुरावाही नाही. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात हा उपाय योग्य नाही. कोरोना दिवसा पसरतो आणि रात्री पसरत नाही, असे सरकारला वाटते काय?”
- डॉ. मिलिंद वाटवे, जैवशास्त्रज्ञ