हज कमिटीवर विदर्भातून एकही सदस्य नाही
By Admin | Updated: September 9, 2014 05:11 IST2014-09-09T05:11:34+5:302014-09-09T05:11:34+5:30
मुस्लीम समूदायाच्या दृष्टीने महत्वाची मानली जाणार्या हज कमिटीवर विदर्भातून एकही सदस्य नियुक्त केला गेला नाही.

हज कमिटीवर विदर्भातून एकही सदस्य नाही
यवतमाळ : मुस्लीम समूदायाच्या दृष्टीने महत्वाची मानली जाणार्या हज कमिटीवर विदर्भातून एकही सदस्य नियुक्त केला गेला नाही. त्यामुळे विदर्भातील २६ लाख मुस्लीम मतदारांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या दिग्रस-दारव्हा या परंपरागत मतदारसंघातूनच बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी केली जात आहे. दारव्हा नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष तथा माणिकरावांचे निकटवर्तीय मानले जाणार्या सय्यद फारुक यांनी 'लोकमत'कडे मुस्लीम समाज बांधवांची काँग्रेस नेत्यांवरील नाराजी व्यक्त केली. सय्यद फारुक म्हणाले, १५ सदस्यीय हज कमिटीवर दर तीन वर्षांनी नवे सदस्य नियुक्त केले जातात. गेली चार वर्ष या समितीकडे लक्षच दिले गेले नाही. यावेळी या समितीची पुनर्रचना केली गेली. मात्र काँग्रेसने आपल्या कोट्यातून विदर्भातून एकही सदस्य या कमिटीवर नियुक्त केला नाही. मराठवाड्यातही केवळ एक सदस्य समितीवर घेतला गेला. बहुतांश सदस्य काँग्रेसने मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील घेतले आहे. विदर्भात २६ लाख मुस्लीम मतदार असताना एकही प्रतिनिधित्व काँग्रेसकडून हज कमिटीवर दिले जाऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विधान परिषद निवडणुकीतसुद्धा वैदर्भीय मुस्लीम बांधवांकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले.
या प्रकरणात काँग्रेस नेत्यांना नाराजी बाबतची निवेदने दिली गेली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना भेटलो असता 'मुख्यमंत्री माझे ऐकत नाहीत' असे म्हणून त्यांनी हातवर केल्याचे सय्यद फारुक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)