पाद्यपूजेत हस्तक्षेप नाही
By Admin | Updated: July 22, 2015 00:45 IST2015-07-22T00:45:04+5:302015-07-22T00:45:04+5:30
गेली २५० वर्षे आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची सर्वप्रथम पाद्यपूजा करण्याचा श्रीमंत खासगीवाले यांचा मान मंदिर समितीने

पाद्यपूजेत हस्तक्षेप नाही
मुंबई : गेली २५० वर्षे आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची सर्वप्रथम पाद्यपूजा करण्याचा श्रीमंत खासगीवाले यांचा मान मंदिर समितीने रद्द केला आहे. या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयानेही नकार दिला. यासाठी श्रीमंतांनी संबंधित अधिकाऱ्याकडेच दाद मागावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या आधी पाद्यपूजा करत होते. त्यामुळे यंदा हा मान श्रीमंतांना मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आषाढीला रात्री १२ वाजता श्रीमंत खासगीवाले व त्यांचा परिवार असे ५१ जण विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करतात. यात १० मिनिटे विठ्ठलाची व १० मिनिटे ्नरुक्मिणीची पूजा होते. त्यानंतर पहाटे ३ वाजता मुख्यमंत्री पूजा करतात. गेल्या वर्षीपर्यंत मंदिर समितीच श्रीमंतांना पूजेसाठी आमंत्रण देत असे. मात्र यंदा समितीने श्रीमंत खासगीवाले यांना हा मान नाकारला. तसा निर्णयच समितीने ५ जुलै २०१५ रोजी घेतला. याविरोधात श्रीमंत संजय भालचंद्र खासगीवाले यांनी अॅड. शशिकांत सुराणा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली होती.
या याचिकेनुसार, १७५०मध्ये छत्रपती शाहू महाराज व पेशवे यांनी खासगीवाले यांना पाद्यपूजेचे अधिकार दिले आहेत. खासगीवाले कोणतीही दक्षिणा किंवा शुल्क घेत नाहीत. त्यामुळे त्यांचा मान काढून घेणे चुकीचे आहे, असे याचिकेत नमूद केले होते. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने समितीला मंदिराचे सर्वाधिकार बहाल करत बडवे व उत्पात यांचे अधिकार काढून घेतले होते. मात्र आम्ही या व्याख्येत मोडतच नाही. तेव्हा न्यायालयाने गेल्या ५० वर्षांपासून झालेल्या पाद्यपूजेचा तपशील मागवावा व तो तपासूनच आम्हाला या पूजेसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. (प्रतिनिधी)