सीईटीच्या वेळापत्रकात बदल नाही : शिक्षणमंत्री

By Admin | Updated: April 30, 2016 01:57 IST2016-04-30T01:57:34+5:302016-04-30T01:57:34+5:30

महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे.

There is no change in CET scheduling: Education Minister | सीईटीच्या वेळापत्रकात बदल नाही : शिक्षणमंत्री

सीईटीच्या वेळापत्रकात बदल नाही : शिक्षणमंत्री

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता पूर्ण तयारीनिशी ही परीक्षा द्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले. या वेळी वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते.
तावडे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालावरुन विदयार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र विदयार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता ५ मे २०१६ रोजी होणारी एमएच-सीईटी परीक्षा दयावी असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे. येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारच्या वतीने फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे.
त्यासाठी महाराष्ट्रातून दोन अधिकारी नवी दिल्ली येथे पोहोचले आहेत. तसेच सदर याचिकावर राज्य सरकारची बाजू मांडण्यासठी विशेष वकीलांची मदत घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विदयार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता आतापर्यंत केलेला अभ्यास लक्षात ठेवून परीक्षेला सामोरे जावे असेही श्री. तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
>आदेशात सुधारणेसाठी केंद्राची धाव
२०१६-१७ या वर्षी राज्य सरकारे आणि खासगी महाविद्यालयांना एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेऊ द्या अशी विनंती केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात तातडीने धाव घेत केली. आमच्यावर नीट परीक्षा लादली जाऊ नये असा तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक वैद्यकीय महाविद्यालय संघटना तसेच वेल्लोरच्या सीएमसीसारख्या अल्पसंख्यक संस्थांनी केलेला युक्तिवाद न्या. ए.आर. दवे, शिवकीर्ती सिंग व ए.के. गोयल यांच्या खंडपीठाने गुरुवारी फेटाळल्यामुळे केंद्राने विद्यार्थ्यांच्या संभ्रमावस्थेकडे लक्ष वेधले.
>परभणीत मोर्चा
नीटबाबतचा संभ्रम दूर करावा, या मागणीसाठी शुक्रवारी परभणीत विद्यार्थी व शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा मोर्चा जिल्हा कचेरीसमोर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने योग्य भूमिका मांडली नाही. आता तरी विद्यार्थी व पालकांचे हीत लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभरात विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व डॉ.हुलसुरे फाऊंडेशनचे डॉ.मारोती हुलसुरे यांनी केले
>सरकारच्या फेरविचार याचिकेतील मुद्दे
महाराष्ट्र राज्याने सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी एकच सीईटी असावी, असा कायदा पारित केला असल्याने महाराष्ट्रात खेडोपाडी आणि गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे.
एमएचसीईटी परीक्षा आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अभ्यासक्रमावर (एसएससी आणि एचएससी बोर्ड) आधारीत असणार आहे. आतापर्यंत सीबीएसई/आयसीएसई बोर्डावर आधारीत अभ्यासक्रमावर सीईटी होत होती. यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि गरीब विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करणे कठीण जात असे. त्यामुळे महाराष्ट्रातील अधिकाधिक विदयार्थ्यांना सीईटी परीक्षेची संधी मिळावी, यासाठी एमएच-सीईटी परीक्षा आता एसएससी आणि एचएससी बोर्ड अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. याचा फायदा महाराष्ट्राच्या तळागाळातील विदयार्थ्यांनाही होणार आहे. नीटच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा सीबीएसईच्या धर्तीवर आहे. परंतु महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी एसएससी बोर्डाचे असतात. त्यामुळे या दोन्ही अभ्यासक्रमामध्ये तफावत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसई च्या धर्तीवरील परीक्षा अचानक देण्यास सांगितल्यास त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो.
>...तर वैद्यक अभ्यासक्रमांसाठी सीईटी होणारच
धुळे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही इतर अभ्यासक्रमांसाठी ५ मे रोजी होणारी राज्याची सीईटी परीक्षा होईलच. सर्वोच्च न्यायालयाने एमबीबीएस व बीडीएस याच अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा घ्यावी, असा निर्णय दिला आहे. मात्र आयुर्वेद (बीएसएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), यूनानी (बीयूएमएस) यासह अन्य वैद्यकशास्त्रांचे पदवी अभ्यासक्रम व अभियांत्रिकीचेही प्रवेश सीईटीनुसार द्यावे लागणार आहेत. त्यामुळे सीईटी परीक्षा होईल. सरकारकडून मात्र अद्याप याबाबत काही सूचना वा परिपत्रक प्राप्त झालेले नाही. सरकारच्या नोटिफिकेशननुसार पुढील कार्यवाही केली जाईल. - डॉ. एस. एस. गुप्ता, अधिष्ठाता, कै. भाऊसाहेब हिरे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय धुळे
>विद्यार्थ्यांनी सीईटीची तयारी केली असून त्यांना अचानकपणे ‘नीट’ परीक्षा द्या, असे सांगणे अन्यायकारक आहे. किमान दोन वर्षांपूर्वी निर्णय जाहीर करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ‘नीट’च्या निर्णयाविरोधात अनेक राज्ये याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. सध्या या निर्णयामुळे गोंधळाची स्थिती आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता याचा फेरविचार होणे आवश्यक आहे.
- डॉ. नितीन नायक, संचालक, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, भारती विद्यापीठ
>कुठलेही निर्देश नाहीत
आम्हाला मुंबईहुन कुठलेही दिशानिर्देश मिळालेले नाहीत. आम्हाला सीईटीची तयारी पूर्ण करायची आहे. राज्यात सीईटीसाठी ४,०९,२३३ विद्यार्थी बसले आहेत. नागपुरात २५७७६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार सीईटीची परीक्षाच होईल.
- डॉ. संजय पराते,
विभागीय अधिकारी, सीईटी, नागपूर
विद्यार्थ्यांचे नुकसान होईल
सध्या सीईटीची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा जबर धक्का आहे. त्यांची संधी हिरावणार आहे. परीक्षा तोंडावर असताना अशा प्रकारचा निर्णय झाल्यामुळे विद्यार्थी व पालक अस्वस्थ आहेत. त्यामुळे सरकारची भूमिका महत्त्वाची आहे.- डॉ. संजय चरलवार, प्राचार्य,
मोहता विज्ञान महाविद्यालय
विद्यार्थी अस्वस्थ
या निर्णयामुळे विद्यार्थी अक्षरश: रडाकुंडी आले आहे. पालकांचीही अवस्था विद्यार्थ्यांप्रमाणेच आहे. पालक दोन दिवसांपासून अपेक्षित निर्णयासाठी टीव्हीपुढे बसले आहे. सरकारने सीईटीच घ्यावी, पुढच्या वर्षीपासून ‘नीट’ लागू करावी, अशी अपेक्षा आहे.
- पराग तळेगावकर, पालक
विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत
सर्वाेच्च न्यायालयाचा घेतलेला निर्णय योग्य आहे. परंतु त्याच्या तयारीसाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी द्यायला हवा. अगदी वेळेवर हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत आले आहे. कारण अभ्यासक्रम पूर्णत: वेगळा आहे.
- डॉ. अर्चना कोठारी, सचिव,
इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखा
तीन दिवसांत कसा अभ्यास होणार?
‘नीट’ परीक्षेसंदर्भात घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु वेळ चुकली आहे. ही परीक्षा पुढील वर्षी घ्यायला हवी. तीन दिवसांवर परीक्षा आली असताना बदलेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे शक्य होणार नाही.
- डॉ. सागर मुंदडा, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड
ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
याचा सर्वात जास्त फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. न्यायालयाने विद्यार्थी व पालकांची भूमिका समजावून घ्यायला हवी होती. परंतु तसे झाले नसल्याचे दिसून येत आहे. आता राज्य शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. संजय देशपांडे, माजी अध्यक्ष, आयएमए.
विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण
अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यासक्रम पूर्ण करायचा व परीक्षा द्यायची़ हे भयंकर आहे़ विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे़ या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण वाढणार आहे. - प्रा़ गणेश चौगुले, विषयतज्ज्ञ
आवडीचे महाविद्यालय मिळणे अवघड
सेंटर आॅफ एक्सलन्स असणाऱ्या महाविद्यालयांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. ज्यांना या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे. ते विद्यार्थी सामायिक प्रवेश परीक्षा देत नव्हते. आता ‘नीट’च्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. शिवाय त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
- डॉ. एस. एच. पवार, कुलगुरू,
डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर
प्रवेशासाठी नुकसान नाही
‘नीट’मुळे महाराष्ट्रातील ८५ टक्के मुलांना राज्यातच प्रवेश मिळणार आहे. उर्वरित १५ टक्केप्रवेश हे इतर राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी असतील. हा पॅटर्न सर्व राज्यांसाठी असेल. यामुळे प्रवेशापुरते राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान नाही. मात्र सीईटीचा मुलांनी अभ्यास केल्यामुळे व अचानक नीट परीक्षा समोर आल्याने सर्व नाराज होणे स्वाभाविक आहे.
- डॉ. एम. एस. बेग, प्राध्यापक,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
वर्षाच्या शेवटी निर्णय चुकीचा
राज्य शासनातर्फे घेण्यात येणारी सीईटी ही परीक्षा सक्षम असून महाराष्ट्र शासनाने आपल्या निर्णयावर ठाम राहावे. ऐन परीक्षेच्यावेळी अशापद्धतीचे गोंधळ होतच राहिल्यास विद्यार्थी यामध्ये मोठ्या प्रमाणात भरडले जातील.-हरीष बुटले, सीईटी क्लास चालक

Web Title: There is no change in CET scheduling: Education Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.