संक्रांत नेहमी 14 जानेवारीलाच येते, यात काहीही तथ्य नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 08:58 IST2025-01-12T08:58:28+5:302025-01-12T08:58:46+5:30

आपले सर्व सण हिंदू कालमापनावर अवलंबून असताना, नेमका मकर संक्रांतीचा सण इंग्रजी कालमापनावर अवलंबून कसा, असेही विचारले जाते, पण मकर संक्रांती नेहमी 14 जानेवारीलाच येते यात काहीही तथ्य नाही. 

There is no truth to the fact that Sankranti always falls on January 14th! | संक्रांत नेहमी 14 जानेवारीलाच येते, यात काहीही तथ्य नाही!

संक्रांत नेहमी 14 जानेवारीलाच येते, यात काहीही तथ्य नाही!

दा. कृ. सोमण
पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

सूर्याने २१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ‘सायन’ मकर राशीत प्रवेश केला. त्या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ झाला. त्या दिवशी आपल्याकडे दिनमान फक्त १० तास ५७ मिनिटांचे होते. रात्र १३ तास ३ मिनिटांची मोठी होती. त्या दिवसापासून आपल्याकडील दिनमान वाढू लागले. ही घटना आनंददायी आहे.

आपली पंचांगे ही ‘निरयन’ राशी-नक्षत्रांवर आधारित आहेत. मंगळवार, १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे, म्हणून मकर संक्रांतीचा सण हा १४ जानेवारी रोजी साजरा करावयाचा आहे. दिनमान वाढत जाण्याचा आनंद प्रकट करण्यासाठी हा उत्सव येत असतो. माणसामाणसातील गैरसमज, शत्रुत्व, द्वेष, मत्सर यांचा अंधकार हा लहान होत जाणाऱ्या रात्रीमानाप्रमाणे कमी होत जावा, यासाठी एकमेकाला ‘तीळ-गूळ’ देऊन गोड बोलण्याचा संदेश हा सण देत असतो.
संक्रांत अशुभ नाही.

संक्रांत ही वाईट असते, अशुभ असते, हाही एक गैरसमज आहे. दिनमान वाढत जाणे हे वाईट व अशुभ कसे असू शकेल, उलट ती एक चांगली गोष्ट असते. शुभ गोष्टच आहे. आनंदाचीच गोष्ट आहे. त्यामुळे चांगली गोष्ट झाली त्यावेळीच ‘संक्रांत आली’ असे म्हटले पाहिजे. संक्रांतीने संकरासूर राक्षसाला ठार मारले आणि दुसऱ्या दिवशी संक्रांतीदेवीने किंकरासूर राक्षसाला ठार मारले, असे प्राचीन कथेत सांगितले गेले आहे. संक्रांती देवीने जर राक्षसांना ठार मारले, तर ते वाईट कसे असेल? ही तर चांगलीच गोष्ट आहे.

मकर संक्रांत ही नेहमी १४ जानेवारीलाच येते हेही खरे नाही. आपले सर्व सण हिंदू कालमापनावर अवलंबून असताना, नेमका मकर संक्रांतीचा सण इंग्रजी कालमापनावर अवलंबून कसा, असेही विचारले जाते. पण, मकर संक्रांती नेहमी १४ जानेवारीलाच येते यात काहीही तथ्य नाही. सन २००० मध्ये निरयन मकर संक्रांती १५ जानेवारीला आली होती. सन १८९९ मध्ये मकर संक्रांती १३ जानेवारीला आली होती. सन १९७२ पर्यंत निरयन मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती.

सन १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांती कधी १४ जानेवारीला, तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकरसंक्रांती १६ जानेवारीला येईल. अशा रीतीने निरयन मकरसंक्रांतीचा दिवस पुढे जात-जात सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती १ फेब्रुवारीला येणार आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की, मकर संक्रांतीचा आणि १४ जानेवारी या तारखेचा तसा काहीही संबंध नाही.

फार प्राचीन काळापासून मकर संक्रांतीच्या दिवशी तीळगूळ देण्याची प्रथा आहे. मकरसंक्रांतीच्या दिवसात खूप थंडी असते. थंडीमध्ये तीळ आरोग्यास खूप चांगले असतात. थंडीमध्ये आपली त्वचा कोरडी होते. तिळाचे तेल लावल्याने त्वचा तेजस्वी होते. वर्षभर ज्यांच्याशी मतभेद झाले असतील, भांडण झाल्याने अबोला धरला गेला असेल, तर या दिवशी ‘तीळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून, तीळगूळ खाऊन संबंध चांगले सुधारता येतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याचे प्रथा आहे. दिनमान वाढत जाते. या आनंद सोहोळ्याच्या निमित्ताने सूर्याला पतंग उडवून वंदन करण्याची प्रथा आहे. मात्र, पतंग उडवीत असताना, एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी की आकाश हे पक्ष्यांचेही आहे. पतंगाच्या धारदार नायलॅान मांजामुळे अनेक पक्षी जखमी होतात. त्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे.

मकर संक्रांतीच्या दिवसात महिला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात, कारण वस्त्राचा काळा रंग या थंडीच्या दिवसात उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतो. मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी विवाह होऊन घरात आलेल्या सूनेचा आणि नवीन जन्मलेल्या मुलांचाही मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून हलव्याच्या दागिन्यांनी सजविले जाते. हा एक आनंद सोहळा असतो. महिला सुघटात हलवा, तीळ-गूळ, ऊस, बोरे, हरभरे वगैरे पदार्थ घालून दान देतात. हळदी-कुंकू समारंभ साजरे केले जातात.

Web Title: There is no truth to the fact that Sankranti always falls on January 14th!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.