पीक विमा योजनेतून भरपाईपोटी सरसकट १७,५०० रुपये मिळतीलच याची नाही खात्री
By नितीन चौधरी | Updated: November 6, 2025 12:58 IST2025-11-06T12:57:41+5:302025-11-06T12:58:22+5:30
महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे

पीक विमा योजनेतून भरपाईपोटी सरसकट १७,५०० रुपये मिळतीलच याची नाही खात्री
नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यात पीक विमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात ही मदत महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे. मात्र, महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे. त्यानुसार विमा कंपनी भरपाई देईल. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री नाही.
पीकविमा योजनेत ९० टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. आतापर्यंत ८२ टक्के पीक कापणीतील उत्पादनाचे आकडे आले आहेत. पूर्ण अहवाल येण्यासाठी १५ डिसेंबर उजाडेल. त्यानंतर मदत दिली जाईल.
कुणाला मिळेल मदतीचा लाभ?
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे, अशांनाच मदत मिळेल. ती महसूल मंडळनिहाय बारा ठिकाणी घेतलेल्या पीक कापणी उत्पादनाच्या सरासरीवर अवलंबून असेल.
कशी ठरणार भरपाई?
या सरासरीची गेल्या पाच वर्षांमधील सरासरी उत्पादनाशी (उंबरठा उत्पादन) तुलना केली जाणार आहे. उंबरठा उत्पादनापेक्षा सरासरी उत्पादन कमी असल्यास संबंधित महसूल मंडळातील शेतकरी पात्र असतील. सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या दहा टक्के कमी असल्यास विमा संरक्षित रकमेच्या दहा टक्केच भरपाई मिळेल. सोयाबीनसाठी विमा संरक्षण रक्कम ५६ हजार रुपयांपर्यंत आहे. संपूर्ण नुकसानभरपाई मिळण्यासाठी सरासरी उत्पादन शून्य असणे अपेक्षित आहे.