शिवस्मारकासाठी नैसर्गिक बेटाचाही पर्याय

By Admin | Updated: February 1, 2015 01:20 IST2015-02-01T01:20:01+5:302015-02-01T01:20:01+5:30

मुंबईत अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील अडथळे दूर झाले असून, येत्या शिवजयंतीला उद्घाटनाची तयारीही सुरू आहे.

There is also an alternative to natural island for Shivsmara | शिवस्मारकासाठी नैसर्गिक बेटाचाही पर्याय

शिवस्मारकासाठी नैसर्गिक बेटाचाही पर्याय

पुणे : मुंबईत अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील अडथळे दूर झाले असून, येत्या शिवजयंतीला उद्घाटनाची तयारीही सुरू आहे. मात्र अद्याप समुद्रामध्ये कृत्रिम बेट उभारून स्मारक उभारावे की अलिबागच्या जलदुर्गासारख्या एखाद्या नैसर्गिक बेटावर भव्य स्मारक उभारले जावे, याबाबत विचारमंथन सुरू आहे.
छत्रपतींचे शिल्प साकारताना प्रमाणबद्धतेचा मुद्दा लक्षात घेऊन अश्वारूढ शिल्पाऐवजी स्वराज्याचा राजदंड हातात घेतलेले उभे शिल्प साकारावे, असाही मुद्दा समोर
आला आहे. मात्र हे स्मारक भव्य असावे आणि लवकरात लवकर साकारले जावे, याबाबत सर्वांचेच एकमत आहे.
शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक - अध्यक्ष अमित गायकवाड यांनी अश्वारूढ शिल्पाच्या प्रमाणबद्धतेवर अभिनव उपाय सुचविला आहे. उजव्या हातात राजदंड आणि डाव्या हातात तलवार घेतलेले शिवरायांचे उभे शिल्प उभारावे, अशी कल्पना त्यांनी मांडली आहे. यासाठीचे मॉडेलही तयार केले जात असून, ते राज्य शासनाला लवकरच सादर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गायकवाड म्हणाले, की राज्य शासनाने स्मारकासंदर्भात तातडीने पावले उचलून भूमिपूजनाची तयारी केली, हे अभिनंदनीय आहे. शिवरायांचे स्मारक हे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतच उभारले जावे. शिवरायांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. मराठी माणसासाठी शिवराज्याभिषेकाचा दिवस हा अत्यंत अभिमानाचा आहे. त्यामुळे उजव्या हातात राजदंड आणि डाव्या हातात तलवार घेतलेले शिवरायांचे १९० फूट उंचीचे ‘स्वराज्याचे शिल्प’ असावे. राजदंडामधून लिफ्टची व्यवस्था असावी. त्याद्वारे महाराजांचे मुखदर्शन घेणे शक्य होईल. समुद्राच्या पार्श्वभूमीवर शिवरायांचा जन्मपट उलगडणारा लेझर शो असावा. त्याचबरोबर महाराजांसंदर्भातील सर्व वाङ्मयही तेथे शिल्पस्वरूपात असावे. आम्ही या शिल्पाचे मॉडेल केले असून, ते राज्य शासनाला लवकरच सादर करणार आहोत. राज्य शासनाने त्याचा विचार करावा, अशी विनंती करणार आहोत. मुख्य म्हणजे अश्वारूढ असो की आम्ही सुचविलेले, कोणत्याही स्मारकाचे काम लवकर सुरू होणे महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांनी दिलेले विचार जगासमोर येणे जास्त महत्त्वाचे आहे.

इकॉलॉजी, सुरक्षेचा
शास्त्रीय अभ्यास गरजेचा
अरबी समुद्रात कृत्रिम बेट निर्माण करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा घाईचा आहे. यासाठी कोणताही शास्त्रीय अभ्यास करण्यात आलेला नाही. समुद्रात ज्या ठिकाणी बेट उभारण्यात येणार आहे तेथील इकॉलॉजी काय आहे, कोणत्या स्पेसीज आहेत याचा सखोल अभ्यास व्हायला हवा.

स्मारकाचा पाया भरताना किती विध्वंस केला जाणार आहे व तेथील इकॉलॉजीवर त्याचा किती परिणाम होणार, कोणत्या स्पेसीज नष्ट होतील याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास होणे गरजेचे आहे. याबरोबर या स्मारकाचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास होणे गरजेचे आहे.

त्सुनामी सारख्या घटना घडल्या तर सुरक्षितरीत्या कसे बाहेर पडता येईल, याचा अभ्यास करूनच स्मारक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सांगितले.

नैसर्गिक बेटांवर स्मारक उभारावे
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी कृत्रिम बेट निर्माण करण्यापेक्षा खांदेरी, उंदेरी यासारख्या नैसर्गिक बेटांवर स्मारक उभारण्याचा विचार शासनाने करावा. कृत्रिम बेटांचा खर्च गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरावा, हीच जनसामान्यांची भावना असेल. त्यामुळे नव्या सरकारने विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.
- सुहास बहूळकर, ज्येष्ठ चित्रकार

हवेच्या दाबाचा विचार करावा
अरबी समुद्राऐवजी छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी अथवा लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे कापली तेथे झाले तर उचित होईल. अरबी महासागरात स्मारक झाले, तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला खारे वारे झेलत बसावे लागेल व त्याचे रूपांतर पर्यटन केंद्रात होईल.
- संभाजीराव भिडे, संस्थापक, शिवप्रतिष्ठान

वाऱ्याच्या दाबाचा विचार करावा
प्रगत तंत्रज्ञानामुळे आज समुद्रात मोठमोठे पूल उभारले जात असल्याने समुद्रात शिवस्मारक उभारणे हे तितकेसे अवघड काम नाही. समुद्रात कोणतेही शिल्प साकारायचे असेल तर त्याच्या उंचीचा विचार करावा लागतो. शिवाजी महाराजांचा घोड्यावर स्वार असलेला पुतळा ज्या चौथऱ्यावर उभा राहणार, तो कशा पद्धतीने उभारणार, हे जास्त महत्त्वाचे आहे. समुद्रातील वाऱ्याच्या दाबाचा काही अंशी विचार करावा लागेल.
- विवेक खटावकर, प्रसिद्ध शिल्पकार

समुद्रात स्मारक होणे वावगे नाही
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात होण्यास काही वावगे नाही. स्मारक १५० फूट उंचीचे असावे; ज्यात ५० फूट उंचीचा चबुतरा आणि १०० फूट उंचीचा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असावा. मात्र प्रश्न स्मारकाच्या देखभालीचा आहे.
- बी. आर. खेडकर, ज्येष्ठ शिल्पकार

शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा ऊहापोह व्हावा
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, विज्ञानवाद, व्यवस्थापन शास्त्र, नऊ जणांचे मंत्रिमंडळ स्थापण्याची लोकशाही नीती, गनिमी काव्याचे युद्धतंत्र अशा सर्व बाबींचा ऊहापोह चलतचित्रांच्या, म्युरल्सच्या किंंवा भित्तिचित्रांच्या माध्यमातून केला जावा.
-विकास पासलकर, प्रदेश उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

मुंबईतील मालवणी येथे स्मारक व्हावे
मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मराठा सेवा संघाच्या वतीने कांदिवलीजवळील मालवणी येथे शिवस्मारक उभारण्याची मागणी केली होती. या ठिकाणी स्मारकासोबत धावपट्टी, हेलिपॅड आदी सुविधा करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करून घेता येऊ शकेल. समुद्रामध्ये स्मारक उभारल्यास सामान्य माणसाला तेथपर्यंत पोहोचणेही कदाचित अवघड होऊ शकते. त्यामुळे दुसरा विचार करता येऊ शकतो. - पुरुषोत्तम खेडेकर, संस्थापक, मराठा सेवा संघ

मुंबईत उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाविषयी राज्य शासनाने किंवा शासनाच्या प्रतिनिधींनी आपल्याशी काही चर्चा केलेली नाही. त्यामुळे हे स्मारक कसे असेल, हे मला सांगता येणार नाही. याबाबत शासनाकडून विचारणा झाल्यास आपण सर्व प्रकारचे सहकार्य देण्यास तयार आहोत. एशियन हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक - अध्यक्ष पद्मभूषण राजीव सेठी यांची राज्यातील एखाद्या शहरात शिवाजी महाराजांच्या विचारांचे संग्रहालय उभारण्याची संकल्पना आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी माझी नुकतीच भेट घेतली.’’
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

Web Title: There is also an alternative to natural island for Shivsmara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.