...तर आपण एकटे लढू, उद्धव ठाकरे यांची मेळाव्यात घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 07:55 IST2025-01-24T07:54:59+5:302025-01-24T07:55:29+5:30

Uddhav Thackeray News: आपण भ्रमात राहिलो म्हणून आपली फसगत झाली. तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा, आपल्याशी कपटाने वागणाऱ्यांना उचलून आपटण्याची हिंमत तुम्ही दाखवणार असाल, सूड घेणार असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मी एकट्याने लढल्याशिवाय राहणार नाही.

...then we will fight alone, Uddhav Thackeray's announcement at the rally | ...तर आपण एकटे लढू, उद्धव ठाकरे यांची मेळाव्यात घोषणा

...तर आपण एकटे लढू, उद्धव ठाकरे यांची मेळाव्यात घोषणा

मुंबई - आपण भ्रमात राहिलो म्हणून आपली फसगत झाली. तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा, आपल्याशी कपटाने वागणाऱ्यांना उचलून आपटण्याची हिंमत तुम्ही दाखवणार असाल, सूड घेणार असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मी एकट्याने लढल्याशिवाय राहणार नाही. महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेईन, अशा शब्दांत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल भाष्य केले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी अंधेरी येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री पदासाठी रस्त्यावर टायर जाळणारे, बाळासाहेबांचे शिवसैनिक असूच शकत नाहीत, अशी टीका करताना हिम्मत असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या आणि जिंकून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा समोर भेटत आहे. जो निकाल लागला तो पटणारा नाही. कितीजण सोबत आहे हे पाहण्यासाठी मोठ्या मैदानात मेळावा घेतला आहे. मला ही जागा शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे. जोपर्यंत शिवसैनिक सोबत आहे तोपर्यंत ही जागा सोडणार नाही. पण, बाळासाहेबांचे विचार सोडले असे एकही निष्ठावंत म्हणाला, तर हे पदही सोडेन, असे ते म्हणाले. उद्धवसेनेचे ऑनलाइन सदस्य नोंदणीचे उद्घाटन आणि सक्रिय सदस्य अभियानाचा शुभारंभ ठाकरे यांनी केला.

जय शिवराय, जय भवानी बोलावेच लागेल
गेल्या वर्षी २२ जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे उदघाटन झाले. पण, त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. इतकी कशाची घाई होती? श्री राम यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच. पण, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मोदी, शाह जय श्रीराम बोलूच
शकले नसते. 
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यामुळे आम्ही जसे जय श्रीराम म्हणतो त्याप्रमाणे तुम्हालाही जय शिवराय, जय भवानी बोलावेच लागेल, असे ठाकरे यांनी यावेळी ठणकावले.  

महापालिकेनंतर तुमचे काय होते ते पाहा...
आम्ही हरूनही जनता आमचे स्वागत करते. निवडणुकीत बेकायदेशीरपणे यंत्रणा वापरल्या. महापालिकेनंतर तुमचे काय होते ते पाहा. अडीच वर्ष मुख्यमंत्री केले.  आता बसायचे तर बसा नाही तर गावाला निघून जा. मंत्रीपद नाही मिळाले, गेले गावी. दावोसला नेले नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू गावात जाऊन बसू, असा टोला त्यांनी हाणला.

दगाबाजी भाजपमध्येच
१९७८ मध्ये पुलोदचा प्रयोग झाला. त्या सरकारमध्ये जनसंघाचे मंत्री होते. आणीबाणीच्या काळात निवडून आलेला जनता पक्ष फोडण्यात जनसंघ आघाडीवर होता. त्यामुळे दगाबाजी तुमच्यामध्ये दडलेली आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

Web Title: ...then we will fight alone, Uddhav Thackeray's announcement at the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.