२०१९ साली घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर गेल्या पाच सहा वर्षांपासून आपापसातील परस्परविरोधी मुद्दे बाजूला करत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित राजकारण करत आहेत. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे सातत्याने घेत असलेली आक्रमक भूमिका आणि करत असलेली वादग्रस्त टीका यामुळे अनेकदा दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं. आता पुन्हा एकदा सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या एका नेत्याने राहुल गांधी यांना आक्रमक इशारा दिल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते बाळा दराडे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकांबद्दल अपशब्द वापरले तर ते नाशिकला आल्यावर त्यांच्या तोंडाला काळं फासू, काळं फासता आलं नाही तर त्यांच्यावर दगडफेक करू, असा इशारा बाळा दराडे यांनी दिला आहे. दरम्यान, दराडे यांच्या टीकेला काँग्रेसनेही आक्रमक प्रत्युत्तर दिलं असून, राहुल गांधी यांना कुणी हात लावला तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. तर पक्षातील एखाद्या पदाधिकाऱ्याने मांडलेलं मत ही पक्षाची भूमिका होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.
दरम्यान, आज राहुल गांधी यांना इशारा देताना बाळा दराडे म्हणाले की, राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यांना माफीवीर म्हटलं होतं, त्यांच्या त्या विधानाचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधींविरोधात नाशिकमधील वकिलांनी याचिका दाखल केली आहे. त्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी कोर्टात हजर होणार आहेत, अशी माहिती आहे. पण ज्यावेळी राहुल गांधी नाशिकमध्ये येतील, तेव्हा आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू. तसेच त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचू दिलं नाही, तर आम्ही त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि सावरकरांचे हिंदुत्ववादी सैनिक कसे असतात हे त्यांना दाखवून देऊ, अशी धमकी बाळा दराडे यांनी दिली होती.
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी यांनी सावरकरांना कुठलीही शिविगाळ केलेली नाही. तसेच अपशब्द वापरलेले नाहीत. जे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत, ते फक्त समाजासमोर ठेवण्याचं काम त्यांनी केलं आहे. याबाबत वैचारिक स्वरूपाची चर्चा घडून येणं आवश्यक आहे. त्याबाबत कुणी शेलक्या भाषेत बोलत असेल तर ते दुर्दैव आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. तर राहुल गांधी यांना कुणी हात लावला तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. हा वाद चिघळल्यानंतर पक्षातील एखाद्या पदाधिकाऱ्याने मांडलेलं मत ही पक्षाची भूमिका होऊ शकत नाही, असे ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.