कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:03 IST2025-08-01T14:00:55+5:302025-08-01T14:03:10+5:30
'महादेवी' उर्फ माधुरी हत्तीणीला अंबानी यांच्या 'वनतारा' संवर्धन केंद्रात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला होता, त्यानंतर तिला स्थलांतरित करण्यात आले.

कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
Nandani Math Kolhapur : नांदणी येथील लोकांच्या भावना जोडलेल्या 'महादेवी' उर्फ माधुरी हत्तीणीला अंबानी यांच्या 'वनतारा' संवर्धन केंद्रात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला होता, त्यानंतर तिला स्थलांतरित करण्यात आले. पण या निर्णयाविरोधात राज्यात उमटलेल्या जनभावनेची दखल घेत 'वनतारा' संस्थेची टीम तातडीने कोल्हापूरकडे रवाना झाली आहे.
या प्रकरणात कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने यांनी 'वनतारा' टीमसोबत चर्चा केली, त्यानंतर त्यांनी कोल्हापूरला भेट देण्याचा निर्णय घेतला. 'वनतारा'चे सीईओ विहान करणी, जय पेंढारकर यांच्यासह टीममधील महत्त्वाचे सदस्य आणि दोन्ही खासदार कोल्हापूरसाठी रवाना झाले आहेत. खासदार धैर्यशील माने यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केल्याचे बोलले जात आहे.
धैर्यशील माने यांची पोस्ट
खासदार धैर्यशील माने यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'महादेवी आमची होती.. आणि आमचीच राहील...दिल्लीमध्ये असतानाही तातडीने पुढाकार घेत खास. डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि अनंत अंबानी यांच्याशी थेट संपर्क साधत या घटनेच्या पार्श्वभूमीची कल्पना दिली. त्यांच्या सहकार्याने वनतारा प्रकल्पाचे सीईओ विहान करणी यांच्याशी थेट संवाद साधला. आता मी स्वतः वनताराचे सीईओ यांच्यासह नांदणी मठाला भेट देणार आहे. महादेवी आमची अस्मिता आहे, आणि तीच परत मिळवू...'
श्रीकांत शिंदे यांनी केली मध्यस्थी
कोल्हापूर दौऱ्यावर असताना, जैन समाजाच्या शिष्टमंडळाने खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन या प्रकरणात लोकांच्या भावना किती तीव्र आहेत हे सांगितले. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ पुढाकार घेऊन अनंत अंबानी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली आणि 'वनतारा' टीमच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी चार्टर विमानाची सोय करून दिली. या चर्चेदरम्यान धैर्यशील माने यांनी या विषयाचे गांभीर्य अधिक प्रभावीपणे मांडले असल्याचेही सांगितले जात आहे.
'वनतारा' प्रकल्पाचे सीईओ विहान करणी हे या ठिकाणी पोहोचून महाराजांची भेट घेणार आहेत. मठाचे अधिपती यांच्याशी चर्चा करून या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे 'महादेवी' हत्तीण पुन्हा कोल्हापुरात परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.