साताऱ्याची तलवार बनणार सारस्वतांची ‘लेखनी’; ९९व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हावर पराक्रम अन् साहित्यशक्तीचा संगम

By सचिन काकडे | Updated: September 13, 2025 17:57 IST2025-09-13T17:56:22+5:302025-09-13T17:57:19+5:30

साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून, या संमेलनाची सध्या जोरकस तयारी

The published emblem of the 99th All India Marathi Literature Conference is a symbol of a historical journey | साताऱ्याची तलवार बनणार सारस्वतांची ‘लेखनी’; ९९व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हावर पराक्रम अन् साहित्यशक्तीचा संगम

साताऱ्याची तलवार बनणार सारस्वतांची ‘लेखनी’; ९९व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हावर पराक्रम अन् साहित्यशक्तीचा संगम

सचिन काकडे

सातारा : तलवारीच्या धारेवर अटकेपार झेंडा रोवणाऱ्या साताऱ्याच्या भूमीत आता लेखनीची धार तळपणार आहे. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नुकतेच प्रकाशित झालेले बोधचिन्ह याच ऐतिहासिक प्रवासाचे प्रतीक बनले आहे. यात तलवारीची शौर्यगाथा आणि लेखणीची ज्ञानशक्ती यांचा सुंदर मिलाफ साधण्यात आला आहे.

साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून, या संमेलनाची सध्या जोरकस तयारी सुरू आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या एका सोहळ्यात संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण प्रसिद्ध व्यंगचित्रकार, शि. द. फडणीस, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह मसाप, मावळा फाउंडेशनचे पदाधिकारी व साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत करण्यात आले. हे बोधचिन्ह शि. द. फडणीस यांच्या कुंचल्यातून साकारण्यात आले असून, त्यामागे गहण अर्थ लपला आहे.

ज्या तलवारीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले, शत्रूंचे मनसुबे उधळून लावले, अटकेपार झेंडा रोवण्याची किमया साध्य करून दाखविली तीच तलवार आता लेखणीच्या रूपातून साहित्याच्या क्षितिजावर उजळणार आहे. बोधचिन्हावर तलवारीचा धाक आणि लेखणीचा विचार यांचा सुंदर गोफ गुंफण्यात आला आहे. हे बोधचिन्ह साताऱ्याच्या मावळ्यांच्या देदीप्यमान पराक्रमाची आठवण करून देते आणि त्याचवेळी मराठी भाषेच्या सामर्थ्यावरही प्रकाश टाकते.

स्वातंत्र्यपूर्व काळातही इथल्या लेखणीने तलवारीसारखीच क्रांती घडवली, याच इतिहासाचा संदर्भ घेऊन फडणीस यांनी हे बोधचिन्ह साकारले आहे. हे चिन्ह केवळ संमेलनाचे प्रतीक नसून, मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्याचा आणि तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याचा निर्धारही व्यक्त करते.

मराठी भाषेचा गौरव

साताऱ्यात होत असलेल्या साहित्य संमेलनामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जो-तो या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात आहे. या सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेले बोधचिन्ह साताऱ्याच्या भूमीला आणि मराठी भाषेच्या गौरवाला वेगळ्या उंचीवर नेणारे ठरणार आहे.

Web Title: The published emblem of the 99th All India Marathi Literature Conference is a symbol of a historical journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.