Mumbai Police: खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 10:26 IST2025-09-01T10:20:03+5:302025-09-01T10:26:44+5:30

Mumbai Police: मराठा आंदोलन आणि गणेशोत्सव या दुहेरी जबाबदारीने मुंबई पोलिसांचे खाकीतील जवान सलग ७२ तास ड्यूटीवर तैनात आहेत.

The 'obstacle-buster' in khaki is on duty for 72 hours! | Mumbai Police: खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी!

Mumbai Police: खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी!

मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई: गणेशोत्सव ऐन भरात आहे. गल्लोगल्ली बाप्पा विराजमान झालेत; पण सणासुदीच्या या धामधुमीत काही चेहऱ्यांवर सणाचा उत्साह नाही, तर जबाबदारीचे भान दिसत आहे आणि हे चेहरे आहेत खाकी वर्दीवाल्यांचे. मराठा आंदोलन आणि गणेशोत्सव या दुहेरी जबाबदारीने मुंबई पोलिसांचे खाकीतील जवान सलग ७२ तास ड्यूटीवर तैनात आहेत. घरचा बाप्पा, घरची आरती, कौटुंबिक गोडवेळ या साऱ्यांचे बलिदान देत हे पोलिस रस्त्यावरच जणू ‘विघ्नहर्ता’ रूप घेऊन उभे आहेत. अनेक जण बंदोबस्ताच्या ठिकाणी व्हिडीओ कॉलद्वारे आरती, पूजेत सहभागी होत आहेत.

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी मुंबईत २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी, अंधेरी, चिंचपोकळी, विलेपार्ले, डोंगरी, उमरखाडीसह विविध ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. याच गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांची दमछाक होत आहे. अनेक पोलिसांच्या घरीही बाप्पा आहेत. यातून शनिवार, रविवार सुटी निमित्ताने कुटुंबीयांना वेळ देता येईल, या विचारात असतानाच शुक्रवारपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडला. पोलिसांच्या सुट्या रद्द झाल्या. गणपती निमित्ताने गावी सुटीवर गेलेल्या पोलिसांनाही पुन्हा बोलावून घेण्यात आले आहे. मराठा आंदोलकांनी सीएसएमटीकडे ये-जा करणारी दक्षिण मुंबईतील महत्त्वाची वाटच अडवल्याने दक्षिण मुंबई तीन दिवस काही तासांसाठी ठप्प झाली. 

याशिवाय केंद्रीय राखीव पोलिस दल, रॅपिड ॲक्शन फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दल यांची प्रत्येकी एका तुकडी आझाद मैदान आणि सीएसएमटीबाहेर तैनात आहे. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांच्या काही तुकड्या देखील आंदोलनाच्या सुरक्षेसाठी वळवण्यात आल्या आहेत. 

विसर्जनामुळे मंगळवार आव्हानात्मक
सोमवारी गौरी पूजन आणि मंगळवारी गौरी विसर्जनानिमित्त सुटी असल्याने या दोन दिवसांत सीएसएमटी स्थानकात नोकरी, धंद्यानिमित्त येणाऱ्या प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असेल, असा पोलिसांचा अंदाज आहे. आंदोलन असेच सुरू राहिल्यास बुधवार मात्र पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

परवानगी मिळाली की नाही? 
सोमवारच्या आंदोलनासाठी परवानगी मिळाली की नाही? याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला. पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती देण्याचे टाळले. त्यात, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बघू, अशी प्रतिक्रिया दिल्याने संभ्रमात भर पडली आहे. मराठा आंदोलकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता गणेशोत्सव बंदोबस्ताचा फौजफाटा सीएसएमटीच्या दिशेने वळवला आहे. त्यामुळे गणेशोत्सव व आंदोलन ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांना रिलिव्हरच नसल्याने त्यांना तेथेच तैनात राहावे लागले आहे. 

अधिकारीही तीन दिवसांपासून रस्त्यावर
पोलिस आयुक्त देवेन भारती, सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अनिल कुंभारे यांच्यासह अपर पोलिस आयुक्त अभिनव देशमुख, पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे, नवनाथ ढवळे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आझाद मैदान, सीएसएमटी परिसरात आंदोलकांना समजावताना दिसत आहेत. अधिकारीही तीन दिवसांपासून घरी गेलेले नाही. 

सोशल मीडियावर विशेष लक्ष
आंदोलनादरम्यान कुठल्याही अफवांना खतपाणी मिळू नये, यासाठी सायबर पोलिस सर्व सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. 

बदलीवर कुणीच नाही 
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी घरी गौरीचे आगमन होणार आहे. मात्र, बदलीवर कोणी उपलब्ध नसल्याने सलग तीन दिवस येथेच आहे. यावर्षी व्हिडीओ कॉलद्वारेच घरच्या गौरीचे दर्शन घेणार असल्याचे लालबाग येथे बंदोबस्तासाठी असलेल्या एका महिला पोलिस अंमलदाराने सांगितले.

फक्त दोन तासांची झोप...
एमटीएचएलवर ट्रॅफिक वळविण्यासाठी असलेले एक वाहतूक हवालदार तीन दिवस एकाच जागी आहेत. ते सांगतात, चौकीला दोन तास झोपायला जातो. तिथेच अंघोळ करून पुन्हा येथे तैनात होतो. 

आरतीसाठीही येतो कॉल
मराठा आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या एका उपनिरीक्षकाने सांगितले, घरी बाप्पा आहे. मी घरून आरतीच्या वेळी व्हिडीओ कॉल आला की फोनवरूनच त्यात सहभागी होतो.

Web Title: The 'obstacle-buster' in khaki is on duty for 72 hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.