Eknath Shinde: पुढची निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढविणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 10:15 IST2022-12-18T10:14:27+5:302022-12-18T10:15:15+5:30
महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान कुणीच करू नये आणि कुणी करीत असेल तर ते योग्य नाही, अशीच स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. - फडणवीस

Eknath Shinde: पुढची निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढविणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जे लोक देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशा मंडळींचा आजचा ‘नॅनो मोर्चा’ होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चावर केली.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा ‘नॅनो’ होतो आहे, तसाच हा ‘नॅनो मोर्चा’ होता. कोणत्या तोंडाने हे लोक मोर्चा काढत आहेत? महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान कुणीच करू नये आणि कुणी करीत असेल तर ते योग्य नाही, अशीच स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. त्यामुळे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो आहे. मुद्दे संपले की अशा कारणांवर मोर्चे काढले जातात. आज मविआतील हे तीन पक्ष विसरले आहेत की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा काही हे सरकार आल्यावर सुरू झालेला वाद नाही. तो वर्षानुवर्षे सुरू आहे. सीमा प्रश्नाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहेत, या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे. कारण, सीमाप्रश्न निर्माण करणारा काँग्रेस पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आराध्य कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील.
‘त्यांची’ कॅसेट वारंवार तेथेच अडकते
nउद्धव ठाकरेंनी मुंबई तोडण्याच्या केलेल्या आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांची कॅसेट वारंवार तेथेच अडकते आहे आणि ती १० वर्षांपासून तेथेच अडकली आहे.
nत्यांनी काही नवीन लोक नेमावे आणि त्यांनी त्यांना नवीन मुद्दे द्यावेत, अशी माझी त्यांना विनंती आहे. मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही.
nकारण, भारताचे संविधान सर्वोच्च आहे. पण, त्यांना सांगायला दुसरे मुद्देच नाहीत.
पुढील निवडणुकाही आम्हीच जिंकू
शिंदे सरकार फेब्रुवारीपर्यंत पडेल, या संजय राऊत यांच्या विधानावर फडणवीस म्हणाले की, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण तर करेलच पण पुढची विधानसभा निवडणूक आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढू व जिंकूदेखील. मोर्चात तीन पक्ष एकत्र येऊन ‘ड्रोन शॉट’ दाखविता आले नाहीत, तुम्हाला ‘क्लोज शॉट’ दाखवावे लागले.