नाट्य संमेलनाची सांगता एप्रिलमध्ये; वर्षभरानंतर मिळाला मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 06:36 IST2025-01-15T06:36:09+5:302025-01-15T06:36:34+5:30
१०० व्या नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचे रत्नागिरी हे ठिकाण निश्चित असले तरी तारीख पुढे ढकलण्यात आली.

नाट्य संमेलनाची सांगता एप्रिलमध्ये; वर्षभरानंतर मिळाला मुहूर्त
मुंबई : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये ५ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या थाटात शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विभागीय संमेलने सुरू झाली. ही संमेलने संपल्यावर मुख्य नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचे नियोजन होते, पण वर्ष संपले तरी अद्याप याला मुहूर्त मिळालेला नाही. आता हा सोहळा एप्रिलमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
१०० व्या नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचे रत्नागिरी हे ठिकाण निश्चित असले तरी तारीख पुढे ढकलण्यात आली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते प्रशांत दामले म्हणाले की, २५, २६, २७ जानेवारीला अहिल्यानगरचे विभागीय संमेलन होणार आहे. फेब्रुवारीमध्ये नागपूर आणि मुंबईमध्ये दोन दिवसीय संमेलने होतील.
अद्याप यांच्या तारखा ठरलेल्या नाहीत, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुंबईतील संमेलनाची जबाबदारी प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अध्यक्षांनी जरी मुख्य नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याची तारीख सांगितली नसली तरी, एप्रिलमध्ये हा सोहळा रत्नागिरीत होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.