ठाकरेंना सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांचे नाव समोर आले; राऊतांनी आजच संकेत दिलेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 20:57 IST2024-02-08T20:56:48+5:302024-02-08T20:57:39+5:30
शिंदे गटाच्या आमदारांना आपले दरवाजे कायमचे बंद केल्याची घोषणा उद्धव ठाकरे करून बसले आहेत. अशातच शिंदेंनी मात्र ठाकरे गटाच्या आमदारांसाठी दरवाजे उघडेच ठेवले आहेत.

ठाकरेंना सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांचे नाव समोर आले; राऊतांनी आजच संकेत दिलेले
राज्यात आता पक्षांतर सुरु झाले असून य़ा गटाचे आमदार त्या गटात जाण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या १६ आमदारांपैकी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तुमच्यासोबत काम करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. या आमदाराच्या मागे ईडीचा ससेमिराही मागे लागलेला आहे. अशातच या आमदाराचे नाव समोर आले आहे.
जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वायकर यांनी मतदारसंघातील सर्व नगरसेवक, शाखाप्रमुखांसह विभाग प्रमुखांना पक्ष प्रवेशाची तयारी करण्याचे आदेश दिल्याची एका वृत्तवाहिनीला सुत्रांनी माहिती दिली आहे.
राष्ट्रवादीचे काही आमदार अजित पवारांवर नाराज असल्याने ते आपल्याकडे परत येतील असा दावा शरद पवार गटाने केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांना आपले दरवाजे कायमचे बंद केल्याची घोषणा उद्धव ठाकरे करून बसले आहेत. अशातच शिंदेंनी मात्र ठाकरे गटाच्या आमदारांसाठी दरवाजे उघडेच ठेवले आहेत.
वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर ईडीची कारवाईही सुरु आहे. संजय राऊत यांनी आजच वायकरांविषयी ट्विट करून भाजपावर टीका केली होती. दरम्यान, वायकर यांनी शिंदेंसोबत गुप्त भेट घेतली होती. यामध्ये पक्ष प्रवेशाबद्दल ठरल्याचे सांगण्यात येत आहे.