Weather Update: भारतात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, यंदाच्या हंगामात आधीच अनेक भागांत अतिवृष्टीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर २०२५ मधील मासिक सरासरी पाऊस दीर्घकालीन सरासरी (१६७.९ मिमी) च्या १०९ टक्क्यांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. बहुतांश प्रदेशांत सामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. ईशान्य व पूर्व भारतातील काही भाग, दक्षिणेकडील काही ठिकाणे, उत्तर-पश्चिम भारतातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक शहरात ऑगस्ट महिनाअखेर ८८२ मिमी इतका पाऊस पडला आहे.
सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून पूर्वोत्तर राज्य, पूर्व भारताचा काही भाग, उत्तरेत असलेल्या जम्मू- काश्मीर, लडाख वगळता देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात वायव्य, मध्य आणि दक्षिण भारतात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तर उर्वरित देशात सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तर देशाच्या बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन व अचानक पूर होऊ शकतात. हरियाणा, दिल्ली, उ. राजस्थानात अडथळा निर्माण होऊ शकतो - मृत्युंजय महापात्रा, महासंचालक