मुंबई - महाराष्ट्राला मोठी राजकीय संस्कृती लाभलेली आहे. यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्राचे नाव देशात अभिमानाने घेतले जात होते. पण भाजप सरकारने मागील १० वर्षापासून महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. विधानसभेत पत्याचा क्लब सुरू आहे तर बाहेर WWF चा आखाडा बनला आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
भाजपा युती सरकारवर टीकेची तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, हे सरकार लोकशाही माननारे नाही तर हम करे सो कायदा पद्धतीने काम करत आहे. एका मंत्र्यांच्या घरात पैशाने भरलेली बॅग सापडते, दुसरा मंत्री विधानसभेत रमी खेळतो तर गृहराज्य मंत्र्यांच्या आईच्या नावाने खुलेआमपणे डान्सबार सुर आहे. अशा मंत्र्यांना तात्काळ बरखास्त करायला हवे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाचार, हतबल आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. महिला असुरक्षित आहेत, महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग आणून त्याचा काळा धंदा जोरात सुरु आहे, तरुण पिढीला नशेखोरीत ढकलले जात आहे. आका, कोयता गँग बिनधास्त धुडगुस घालत आहेत, अवैध धंद्यांचे पीक जोमात सुरु आहेत. कोणालाही पोलीसांचा धाक राहिलेला नाही. ही गुंडगिरी, मवाली संस्कृती आणण्याचे पाप देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. महाराष्ट्राची ती राजकीय संस्कृती आहे. राज्यात विरोधकांना शत्रू मानत नाहीत, वैचारिक मतभेद असतात व विचाराची लढाई विचाराने लढली जाते, त्यामुळे या शुभेच्छातून काही राजकीय समिकरण बदलेल असे वाटत नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.