मुंबई - मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला होता. जरांगे पाटील यांनी थेट राहुल गांधीवर टीका केल्याने काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्या भाषेमुळे मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा हा मनोज जरांगे यांनी खालच्या पातळीवर आणू नये, असे खडेबोल काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुनावले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरली असली तरी राहुल गांधी यांनीच जातीय जनगणनेसाठी रान पेटवले आहे आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल असेही ठणकावून सांगितले आहे. कोणत्याही जातीय संघर्षाशिवाय व कोणालाही न दुखावता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग, हा याच ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्धारातून सुकर होईल. काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून कोणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
सावंत पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष संविधान व संविधानिक मर्यादा मानतो. प्रत्येकाला राजकीय पक्षांवर व नेत्यांवर टीका करण्याचा अधिकार आहे आणि त्या टीकेला उत्तर देण्याचाही अधिकार आहे. परंतु ही टीका संविधानिक चौकटीत, संस्कृतीच्या परिघात आणि सुसंस्कृतपणाच्या मर्यादेत असावी. मराठा समाजाच्या माय भगिनींनी आपल्या ५८ विराट मूक मोर्चांनी देशाला आदर्श घालून दिला आहे. त्या आदर्शाची आठवण प्रत्येकाला असली पाहिजे. आरक्षणाचा लढा लढताना केवळ आरक्षण मिळवून देणे नव्हे तर समाजाला आदर्श घालून देणे ही जबाबदारीही नेत्यांची असते. समाजाची प्रतिमा वाईट होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. त्यातही सर्व मोर्चे आणि हा लढा यापूर्वी राजकीय नव्हता त्यामुळे माझ्यासहित काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला, पण आता मात्र मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांना राजकीय वास येत आहे.
काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा व सर्वांचा पक्ष आहे तो कोणत्याही विशिष्ट जाती धर्माचा नाही. कोणावरही अन्याय होता कामा नये, हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेसच्या शब्दकोशात जुमलेबाजी, जनतेची फसवणूक, खोटे जीआर, गॅझेटच्या नावाने शब्दच्छल हे प्रकार नसतात. जे करायचे ते प्रामाणिकपणे जनसेवेसाठी आणि संविधानाच्या चौकटीत करण्याची धारणा आहे, असेही सचिन सावंत यांनी सांगितले.
Web Summary : Congress strongly criticized Manoj Jarange Patil's language about Rahul Gandhi regarding OBC reservation issues. They suggest his statements are politically motivated and disrespectful to the Maratha community's ideals. Congress emphasizes its commitment to constitutional values and inclusive policies.
Web Summary : कांग्रेस ने ओबीसी आरक्षण के मुद्दे पर राहुल गांधी के बारे में मनोज जरांगे पाटिल की भाषा की कड़ी आलोचना की। उनका सुझाव है कि उनके बयान राजनीतिक रूप से प्रेरित हैं और मराठा समुदाय के आदर्शों के प्रति अनादरपूर्ण हैं। कांग्रेस ने संवैधानिक मूल्यों और समावेशी नीतियों के प्रति अपनी प्रतिबद्धता पर जोर दिया।