NCP Dhananjay Munde: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हे मागील काही दिवसांपासून आजारपणाने ग्रस्त आहे. आपल्याला बेल्स पाल्सी हा आजार झाल्याचं त्यांनी महिनाभरापूर्वी स्पष्टही केलं होतं. मात्र काल धनंजय मुंडे यांचे पक्षातील सहकारी आणि राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका झाल्याचं सांगितलं आणि मुंडे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी पाटील यांचा दावा खोडत पुन्हा एकदा आपल्या आजारपणाबाबत माहिती दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आमचे सहकारी, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार.मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायलाही त्रास होत आहे," असा खुलासा मुंडेंनी केला आहे.
दरम्यान, नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
बाबासाहेब पाटील नेमकं काय म्हणाले होते?
धनंजय मुंडे हे मागील काही आठवड्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना अनुपस्थित राहत असल्याचं दिसत आहे. याबाबत नांदेड दौऱ्यावर असणाऱ्या बाबासाहेब पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी म्हटलं की, "धनंजय मुंडे तब्येत ठीक नाही, त्यांना अर्धांगवायूचा झटका झाला असून डोळेही वाकडे झाले आहेत. परिणामी त्यांना बोलताही येत नाही," असा दावा पाटील यांनी केला होता.
दरम्यान, भगवानगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने धनंजय मुंडे हे गुरुवारी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे उपस्थित राहणार होते. परंतु धनंजय मुंडेंचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला. काही तांत्रिक कारणांनी मुंबईतून विमान उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने जड अंतःकरणाने हा दौरा रद्द करावा लागत असल्याचा खुलासा मुंडे यांच्याकडून करण्यात आला होता.