"प्रभू श्रीरामांनी शिकवले की, असत्य कितीही असुरी असले तरी..."; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:40 IST2025-04-05T17:39:48+5:302025-04-05T17:40:31+5:30
Devendra Fadnavis : "प्रभु श्रीराम यांचं एकूण जीवन पाहता आपण त्यांना युगपुरुष म्हणतो. एक युग प्रवर्तित करण्याचं काम त्यांनी केलं आहे."

"प्रभू श्रीरामांनी शिकवले की, असत्य कितीही असुरी असले तरी..."; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट मत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "श्री रामनवमीच्या पर्वानिमित्त प्रभु श्रीराम यांचे दर्शन घेण्याचा योग प्राप्त झाला, याचा आनंद आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम आपले राष्ट्रपुरुष आहेत. जीवनाची मूल्ये काय असावीत, याचा सर्वोच्च बिंदू प्रभु श्रीराम यांचं जीवन आहे. म्हणूनच आपण श्री रामनवमी उत्साहाने साजरी करतो. प्रभु श्रीराम यांचं एकूण जीवन पाहता आपण त्यांना युगपुरुष म्हणतो. एक युग प्रवर्तित करण्याचं काम त्यांनी केलं आहे" असं म्हटलं.
मुंबई येथील संजोग सहकारी गृहनिर्माण संस्था येथील 'संजोग देवस्थान प्राण प्रतिष्ठापना व लोकार्पण' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं. "प्रभु श्रीराम देव असल्याने ते रावणाशी चमत्काराने लढू शकले असते. पण त्यांनी तसं केल्याचं दिसत नाही. तर प्रभु श्रीराम यांनी समाजातील छोट्या छोट्या लोकांना एकत्र करुन त्यांच्यातले पौरुष, विजीगिषु वृत्ती, अभिमान, आत्माभिमान जागृत केला आणि आपण असुरी शक्तीला परास्त करु शकतो अशी भावना त्यांच्या मनात तयार केली."
"छोट्या छोट्या नरवानरांनी एकत्र येऊन त्या काळातील जगातली सर्वात बलाढ्य शक्ती असलेल्या रावणाचा निःपात केला. म्हणून सामान्य माणूस सत्याच्या मार्गाने जेव्हा चालतो त्यावेळी असत्य कितीही असुरी असले तरी आपण त्याचा निःपात करु शकतो, असा धडा रामायणाच्या माध्यमातून प्रभु श्रीराम यांनी दिला आहे. श्री रामनवमीच्या पर्वानिमित्त प्रभु श्रीराम यांनी आम्हा सर्वांना योग्य मार्गाने चालण्याचा आशीर्वाद द्यावा, त्यांनी जे उच्च मूल्य तयार केले आहेत, त्यांचं पालन करण्याची प्रेरणा द्यावी" असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.