मुंबई - राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, विधी मंडळात कामकाज सुरू असताना रम्मीचा गेम खेळतात आणि सरकार बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही, कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्याप्रती असंनवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित करताना वडेट्टीवार म्हणाले, राज्याचे गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात, एका मंत्र्यांकडे पैश्याचा बॅगा सापडतात पण तरीही यांची पाठराखण जर करण्यात येत असेल तर या सर्व मंत्र्यांवर गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे. लाडकी बहिण म्हणायचे आणि बारमध्ये बहिणींना नाचवायचे असा किळसवाणा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झाला नव्हता, अशी टीका विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. नागपूर मधील बार मध्ये अधिकारी फाईली घेऊन बसतात, गडचिरोलीचे ते अधिकारी असल्याची माहिती समोर येते. गडचिरोलीचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत, असा कारभार सुरू असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, कंत्राटदार आत्महत्या करत आहे बिल थकली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची बँकाकडे ३५ हजार कोटींची थकबाकी आहे. शेतकरी आता कर्ज घेऊ शकणार नाही, शेतकरी अडचणीत आला आहे पण सरकारला त्याचे देणेघेणे नाही.शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी विरोध करत आहे, तरी त्या महामार्गासाठी सरकार पैसे द्यायला तयार आहे पण शेतकरी कर्जमाफी मागत आहे त्यासाठी सरकार तयार नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
महायुती सरकारमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. बाहेरून दाखवायला सगळ सुरळीत आहे पण आतून प्रचंड असंतोष आहे. या सरकारमधील दोन पक्षांना सत्तेत टिकून रहायचे म्हणून तोंड दाबून मुका मार सहन करत आहे अशी टीका विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.