मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणावरून गुरुवारी एकच गदारोळ झाला. विधानपरिषदेत तीनवेळा तर विधानसभेत कामकाज एकवेळा तहकूब करावे लागले. विधानसभेत एकमेकांविरुद्ध टोकाची वैयक्तिक टीका झाल्याने सभागृहातील चर्चेचा दर्जा पार घसरला.
विधान परिषदेत शिंदेसेनेच्या आ. मनीषा कायंदे यांनी माहितीच्या मुद्द्याचा आधार घेत दिशा सालियन हत्येप्रकरणी तिचे वडील उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी काही कलाकार, राजकीय व्यक्तींवर संशय व्यक्त करीत तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे सांगितले. भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी हे प्रकरण सीबीआयकडे पाठवून नव्याने चौकशीची मागणी केली. तर, आ. चित्रा वाघ, आ. उमा खापरे यांनी एसआयटी चौकशीचे निष्कर्ष समोर आले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
ठाकरे गट गैरहजर, काँग्रेस-राष्ट्रवादीचे मौनसभागृहात कोणत्याही सदस्याने संबंधित माजी मंत्र्याचे नाव घेतले नाही. मंत्री नितेश राणे यांनी त्या माजी मंत्र्याच्या अटकेची मागणी केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी ती उचलून धरली. गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, या प्रकरणात कुणीही असो, कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
दानवे-महाजन, परब-चित्रा वाघ यांच्यात खडाजंगीसभापतींनी या विषयावर चर्चेला परवानगी दिली असता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. शिक्षकांत शिंदे यांनी आक्षेप घेतला. आपण सत्ताधाऱ्यांकडे पाहत आहात. विरोधी पक्षाकडे पाहतच नाही, असा आरोप केला. यावरून दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद होऊन त्यांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले.
आ. अनिल परब यांनी आदित्य ठाकरेंची केस कोर्टात पाच वर्षे चालू आहे. यात सीआयडी, सीबीआय आणि एसआयटी चौकशी झाली. दीड वर्ष होऊनही एसआयटी चौकशी रिपोर्ट बाहेर आला नाही. न्यायप्रविष्ठ प्रकरण असताना हा विषय येतोच कसा, असा सवाल केला. आ. कायंदे यांचे जुने ट्विट दाखवीत त्यांच्यावरही आरोप केला. यावरून सत्ताधारी आक्रमक झाले. परब आणि आ. वाघ यांच्यात यावेळी मोठा शाब्दिक वाद झाला. भाजपसह सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी केली.
कस्टोडियल इंटरॉगेशन करण्याची मागणीविधानसभेत भाजपचे आमदार अमित साटम यांनी माहितीच्या मुद्दयाद्वारे दिशा सालियन मृत्यू प्रकरण सभागृहात मांडले. सरकारने चौकशीसाठी एसआयटी नेमली होती तिचा अहवाल जनतेसमोर कधी ठेवणार, असा प्रश्नही केला.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जी नावे घेतली आहेत, त्यात दिशा सालियनचे चार मित्र आहेत, तत्कालीन शासनातील मंत्री आहेत, मुंबई शहराच्या तत्कालीन महापौर आहेत, अशी माहिती दिली व या सर्व व्यक्तींची चौकशी एसआयटी करणार का? गरज पडल्यास या सर्व व्यक्तींचे ‘कस्टोडियल इंटरॉगेशन ’ करणार का? असे प्रश्न उपस्थित केले. खोटेनाटे आरोप करत असाल तर भाविष्यात तुम्हालाच अडचणी निर्माण होतील. आमच्या घराण्याच्या सहा ते सात पिढ्या जनतेसमोर आहेत. आमचा या प्रकरणात दुरान्वयानेही संबंध नाही. पण राजकारण वाईट बाजूने न्यायचे असेल तर मात्र सर्वांचीच पंचाईत होईल. तुम्ही खोट्याचा नायटा करत असाल तर तुमच्यावरही हे पलटू शकते.उद्धव ठाकरे, अध्यक्ष उद्धव सेना
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणात एसआयटीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. पण चौकशी अधिक जलद गतीने केली जाईल, असे सांगितले. सत्ताधारी भाजप व शिवसेना आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे कामकाज तहकूब झाले.