आला थंडीचा महिना..! स्वेटर, कानटोप्या काढा! राज्यात १०, मुंबईचा पारा १६ अंशांपर्यंत घसरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:36 IST2025-11-07T13:35:40+5:302025-11-07T13:36:13+5:30
नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात थंडी अनुभवता येईल

आला थंडीचा महिना..! स्वेटर, कानटोप्या काढा! राज्यात १०, मुंबईचा पारा १६ अंशांपर्यंत घसरणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ऑक्टोबर महिना पावसाच्या सरींत गेल्यानंतर आता नोव्हेंबर थंडी घेऊन येणार आहे. हिमालयातील हवामान बदलामुळे दक्षिण भारताकडे शीत वारे वाहू लागले असून, शनिवारपासून बुधवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान १६ तर, राज्याचे १० अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीनंतर का होईना हुडहुडी भरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात आलेले मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर हीटचे चटके बसले नाहीत. हा महिना सुखावह गेला असतानाच त्यात आणखी भर पडणार असून, नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात थंडी अनुभवता येईल.
गुरुवारी जारी केलेल्या आयएमडीच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या २ आठवड्यांत म्हणजे ७-२० नोव्हेंबरदरम्यान किमान आणि कमाल तापमान सामान्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ
हिमालयात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे थंड वारे दक्षिण भारताकडे वाहू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून शनिवारपासून बुधवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० नोंदविले जाईल. राज्याचे कमाल तापमान २६ तर किमान तापमान १२ ते १० अंश सेल्सिअस असेल. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होईल.
- अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक
महाराष्ट्रात भागपरत्वे कमाल तापमान २८ ते ३२ तर किमान तापमान १८ ते २० अंश आहे. येणाऱ्या थंड वाऱ्यांना सध्या अटकाव नाही. आकाश निरभ्र आहे. महाराष्ट्रात थंडीची शक्यता आहे. शनिवारपासून कमाल व किमान तापमानात महाराष्ट्रात हळूहळू २ ते ३ अंशांनी घसरण होऊन संपूर्ण महाराष्ट्रात थंडीला सुरूवात होईल.
- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ