परभणी - देशातील प्रत्येक जातीसमुहाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लावून धरली होती. अखेर गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा नेतृत्वाखाली आज परभणी शहर काँग्रेस कार्यालयापासून संविधान बचाओ पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलनाने झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरल्याने मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. जातनिहाय जनगणना झाली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. ओबीसीला २७ टक्के आरक्षण आहे ते सुद्धा ६५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. भाजपा मात्र जाती जातीत भांडणे लावत आहे अशावेळी बहुजन समाज एकत्र असणे ही काळाची गरज आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, राज्यात रोज ६ शेतकरी आत्महत्या होत आहेत, मुलांना नोकरी मिळत नाही आणि सरकारला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अदानी अंबानींचे हित महत्वाचे वाटत आहे. गरज नसताना ८८ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यात सरकार प्राधान्य देत आहेत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.