मुख्याध्यापक, शिक्षकांवरील भार झाला कमी : शालेय कामकाजासाठी मिळणार अधिक वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:03 IST2025-04-21T09:03:01+5:302025-04-21T09:03:17+5:30
शिक्षकांचा बराच वेळ समितीचे कामकाज करण्यात जात हाेता. विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या आता चारच केली आहे.

मुख्याध्यापक, शिक्षकांवरील भार झाला कमी : शालेय कामकाजासाठी मिळणार अधिक वेळ
यवतमाळ : शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळेत तब्बल १५ समित्या हाेत्या. काही समित्यांचे कामकाज आणि शाळा समितींकडे असलेले कामकाज यांच्यात समानता आढळून आली. समित्यांमुळे शिक्षक व मुख्याध्यापकांना अधिक काम करावे लागत हाेते. हा भार कमी करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून हाेत हाेती. अखेर शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला. यामुळे आता केवळ चार समित्या राहणार आहे.
शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समिती, परिवहन समिती, मातापालक संघ, शालेय पाेषण आहार याेजना समिती, पालकशिक्षक संघ, शाळा बांधकाम समिती, तक्रार पेटी समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू सनियंत्रण समिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती, स्वयंमूल्यांकन समितीचा समावेश हाेता. शिक्षकांचा बराच वेळ समितीचे कामकाज करण्यात जात हाेता. विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या आता चारच केली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीची रचना राहणार अशी
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सचिव वगळून १२ ते १६ लाेकांची राहणार आहे. यात ७५ टक्के सदस्य पालक राहतील. पदसिद्ध सदस्य सचिव मुख्याध्यापक राहतील. एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य महिला राहतील. समिती दर दाेन वर्षांनी पुनर्गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खासगी शाळांसाठी स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित होणार आहे. याचप्रमाणे अशैक्षणिक आणि दैनंदिन अध्यापनावर परिणाम करणाऱ्या ऑनलाइन कामाच्या संबंधाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे. - विजय कोंबे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती