नगरसेवकांचा निधी ठाणेकरांच्या हाती
By Admin | Updated: March 2, 2017 03:30 IST2017-03-02T03:30:24+5:302017-03-02T03:30:24+5:30
आपला नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा आणि मागासवर्गीय निधी नागरिकांनी सुचवलेल्या कामांवरच खर्च करावा लागणार आहे

नगरसेवकांचा निधी ठाणेकरांच्या हाती
ठाणे : ठाणे महापालिकेतील नगरसेवकांना यापुढे आपला नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा आणि मागासवर्गीय निधी नागरिकांनी सुचवलेल्या कामांवरच खर्च करावा लागणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. यामुळे नगरसेवक निधीच्या नावाने होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराला लगाम बसणार आहे.
नगरसेवक झाल्याने नगरसेवक निधी ताब्यात येईल आणि आपण हवी असलेली कामे करू, असे मांडे खात असलेल्या नगरसेवकांना पालिका प्रशासनाच्या या निर्णयाने धक्का बसला आहे. त्याचवेळी प्रभागातील कोणत्या कामांना अधिक महत्त्व दिले पाहिजे, याचा अंदाज आता थेट ठाणेकरांकडून घेतला जाणार असल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपल्या मतदारांना आपल्याकडून कोणत्या कामाची अपेक्षा आहे, याचा अंदाज नगरसेवकांनाही येईल आणि त्याच कामांना लोकप्रतिनिधी या नात्याने ते प्राधान्य देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त जयस्वाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अनेक वेळा नगरसेवक हे आपल्या खिशातूनच प्रभागातील कामे करत असल्याचे भासवत असतात. त्यातूनच अनेकदा केवळ गटारे, पायवाटा आदी कामांवरच वर्षानुवर्षे निधी खर्च होत असतो. परंतु, आता नागरिकांनीच प्रभागातील कोणती कामे महत्त्वाची आहेत, याची यादी तयार करायची आहे.
स्टेशन, चौकात सूचनापेट्या
ठाणे महापालिकेने ठाणेकरांच्या सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार रेल्वे स्टेशन, महत्त्वाचे चौक, आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी आता सूचनापेट्या ठेवण्यात येणार असून या पेट्यांमध्ये पालिकेमार्फत देण्यात आलेले फॉर्म ठाणेकरांंनी भरून टाकायचे आहेत. त्यामुळे एखाद्या प्रभागातील नागरिक फूटओव्हर ब्रिजचा आग्रह धरतील, तर दुसरीकडे सब वे ची निकड असेल. विद्युतपोल, आरोग्यसेवा, अत्याधुनिक रुग्णालय, मलनि:सारण वाहिन्या, मलनि:सारण प्रकल्प आदींसह उड्डाणपूल आदी कामांची माहिती नागरिक भरून देऊ शकतील. (प्रतिनिधी)
>१० दिवसांत करा सूचना
गुरुवारपासून पुढील १० दिवस नागरिकांच्या सूचना मागवण्यात येतील. त्या एकत्रित करून त्यातील कोणती कामे महत्त्वाची आहेत, त्याची गरज आहे किंवा कसे, हे प्रशासन तपासून पाहील. या कामाकरिता निधीची तरतूद केली जाईल आणि त्यानंतर नगरसेवकांनी नगरसेवक निधी किंवा प्रभाग सुधारणा आणि मागासवर्गीय निधीतून एखादे काम करायचे ठरवल्यास त्यांना या कामांची यादी देऊन त्यानुसार निधीची उपलब्धता करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या कामांचा समावेश आगामी अंदाजपत्रकात देखील केला जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. या माध्यमातून विविध कामांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
>असा होतो नगरसेवक निधीत भ्रष्टाचार
नगरसेवक निधी खर्च करण्याचे सर्वाधिकार नगरसेवकांकडे राहिले, तर ही कामे करणारे कंत्राटदार नगरसेवकांशी संगनमत करून ठरावीक कामे झोपडपट्ट्या व गलिच्छ वस्त्यांत करतात. बऱ्याचदा या कामांच्या निविदा अपेक्षित खर्चापेक्षा कमी दराच्या असतात. त्यामुळे निकृष्ट कामे केली जातात. काही वेळा तर यापूर्वी केलेली कामे रंगरंगोटी करून नव्याने केल्याचे भासवले जाते.
>प्रत्येक नगरसेवकाला मिळतो
२२ लाखांचा नगरसेवक निधी
१३१ नगरसेवकांचा निधी २८ कोटी ८२ लाख, प्रत्येक प्रभाग सुधारणा निधी ४० लाख, ६२ प्रभागांमध्ये मिळून १३ कोटी २० लाख, मागासवर्गीय निधीचे मिळून ४० कोटी, एकूण ८२ कोटी प्रतिवर्षी