गुन्हेगारी रोखण्यात राज्यात ठाणे अव्वल!

By Admin | Published: January 7, 2017 03:50 AM2017-01-07T03:50:02+5:302017-01-07T03:50:02+5:30

२०१५ च्या तुलनेत गतवर्षी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले.

Thane tops in state to prevent crime | गुन्हेगारी रोखण्यात राज्यात ठाणे अव्वल!

गुन्हेगारी रोखण्यात राज्यात ठाणे अव्वल!

googlenewsNext


ठाणे : २०१५ च्या तुलनेत गतवर्षी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले. या कामगिरीने ठाणे जिल्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी दिली. विविध गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्यासाठी आयोजित केलेल्या मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमात ते बोलत होते.
ठाण्यात गत काही वर्षांपासून गुन्ह्यांचे प्रमाण सतत वाढत होते. दरवर्षी सरासरी २० टक्क्यांची वाढ त्यामध्ये होत होती. २०१६ साली मात्र हे प्रमाण २० टक्क्यांनी घटले. या वर्षात मालमत्ताचोरीचे ५ हजार ४०५ गुन्हे घडले. त्यापैकी १ हजार ७२६ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमधील २६ कोटी ६९ लाख ८० हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चेन स्नॅचिंग आणि इतर गुन्ह्यांमधील २ कोटी ८३ हजार ७७ हजार ७५५ रुपयांचे सोनेचांदी फिर्यादींना परत करण्यात आले. याशिवाय, चोरी गेलेली ८ कोटी ३३ लाख ८२ हजार रुपयांची वाहनेही फिर्यादींना परत करण्यात आली. मालमत्तेशी संबंधित इतर गुन्ह्यांमधील १३ कोटी ५३ लाख २७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमालही फिर्यादींना परत करण्यात आला. एकूण २४ कोटी ७० लाख ८७ हजार १७९ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादींना देण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. पोलीस आयुक्तालयाच्या हिरवळीवर पार पडलेल्या या कार्यक्रमात ५४ फिर्यादींना ६२ लाख ६७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. चेन स्नॅचिंगचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्यासह पोलीस अधिकारी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>सौभाग्याचे लेणे मिळाले
वर्तकनगरातील प्रज्ञा राजपूत, आनंदनगरातील विद्याश्री कांबळे यांचे मंगळसूत्र २ वर्षांपूर्वी चोरी झाले होते. पोलिसांच्या प्रयत्नाने सौभाग्याचे लेणे परत मिळाल्याचा आनंद त्यांच्यासह इतर महिलांच्याही चेहऱ्यावर दिसत होता.
४ वर्षांत तीन गाड्या चोरी
पोखरण रोडवरील सुरेश लाड यांच्या दोन कार आणि एक मोटारसायकल गेल्या ४ वर्षांत चोरी झाल्या. सर्व गाड्या पोलिसांनी त्यांना परत दिल्या.
>वर्दीतील माणुसकी
मानपाड्यातील विद्यार्थी सुनील सोमवंशी याची मोटारसायकल चोरी झाल्याने त्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला होता. चितळसर पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दिल्यानंतर तेथील पोलीस उपनिरीक्षक सुर्वे यांनी स्वत:ची मोटारसायकल सुनीलला वापरण्यासाठी दिली. वर्दीतील या माणुसकीचा प्रत्यय आपणास आला असल्याचे सुनीलने यावेळी सांगितले.

Web Title: Thane tops in state to prevent crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.