ठाणे-मुंबईला टोलनाक्यांचा विळखा कायम
By Admin | Updated: June 1, 2015 04:38 IST2015-06-01T04:38:16+5:302015-06-01T04:38:16+5:30
राज्यातील १२ टोलनाके जूनपासून बंद करण्याचा मुहूर्त शासनाने दीड महिन्यापूर्वी घोषित केला आहे. पण, या यादीत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकाही टोलनाक्याचा समावेश

ठाणे-मुंबईला टोलनाक्यांचा विळखा कायम
सुरेश लोखंडे - ठाणे
राज्यातील १२ टोलनाके जूनपासून बंद करण्याचा मुहूर्त शासनाने दीड महिन्यापूर्वी घोषित केला आहे. पण, या यादीत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकाही टोलनाक्याचा समावेश नाही. त्यामुळे विरोधीपक्ष असताना टोलला विरोध करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडूनसुद्धा मुंबई-ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचे उघड झाले आहे.
रस्त्यावरील खर्चापेक्षा जास्त रकमेची वसुली टोलनाक्यांद्वारे होत असल्याचा आरोप सातत्याने झाला. मुंबईला जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी राज्यात सर्वाधिक टोलनाक्यांचा विळखा ठाण्यासह नव्या पालघर जिल्ह्यात सुमारे १६ ठिकाणी आहे. त्यांच्या विरोधात सातत्याने रस्त्यावर उतरणारी शिवसेना-भाजपा आता सत्तेवर असतानाही त्यांच्याकडून या दोन्ही जिल्ह्यांतील एकही टोलनाका बंद करणे शक्य झाले नाही. यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसून टोल बंद करण्यासाठी केलेली आंदोलने केवळ ‘चिथावणी देणारी’ ठरले आहे.
सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी पूर्वी टोलच्या जिझिया कराविरोधात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे कामकाज बंद पाडून सभात्याग केल्याचे अद्याप स्मरणात आहे. जिल्ह्यातील ही टोलधाड नष्ट करण्यासाठी सध्याचे पालकमंत्री व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे सत्तेत असतानाही अपयशी ठरल्याचे राजकीय धुरीणांकडून ऐकायला मिळत आहे. ठाणे-पालघरच्या १६ टोलनाक्यांपैकी ग्रामीण भागालगतच्या ५ नाक्यांवर कार, जीप व एसटी बसेसचा टोल घेणे बंद करण्याचे घोषित करण्यात आले. मात्र, एकही नाका कायमचा बंद करण्यात न आल्यामुळे नागरिकांच्या पदरी निराशा आली आहे. त्यातच मुंबईत जाण्यासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून भूमिका बजावत असलेल्या ठाणे शहरालगतचे टोलनाके बंद करण्यात आले नाहीत.
बंद केलेले व कार, जीप, बसला सवलत दिलेले टोलनाके सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आणि एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प आदींच्या नियंत्रणातील आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यांत उभ्या करण्यात आलेल्या सुमारे १६ टोलनाक्यांपैकी ५ टोलनाके सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत. ५ टोलनाके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंळाचे असून, उर्वरित ५ टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणातील आहेत. यापैकी बंद केलेल्या नाक्यांमध्ये एकाही खाजगी कंपनीच्या टोलनाक्याचा समावेश नाही.