ठाण्यातील वर्तकनगर रंगलेय चित्रीकरणात....
By Admin | Updated: May 21, 2016 03:39 IST2016-05-21T03:39:36+5:302016-05-21T03:39:36+5:30
बोल बजरंग बली की जय... आला रे आला गोविंदा आला... अशा आरोळया देत भर उन्हात दहीहंडीला गोविंदा पथकांची सलामी...

ठाण्यातील वर्तकनगर रंगलेय चित्रीकरणात....
जितेंद्र कालेकर,
ठाणे- बोल बजरंग बली की जय... आला रे आला गोविंदा आला... अशा आरोळया देत भर उन्हात दहीहंडीला गोविंदा पथकांची सलामी... तरुणांबरोबर तरुणींचेही गोविंदा पथक घोळक्या घोळक्याने बाईकवरुन येतांनाचे चित्र सध्या पहायला मिळतेय... ठाण्याच्या वर्तकनगगर भागातील महापालिका शाळेच्या मैदानासमोर...
एरव्ही जुलै किंवा आॅगस्ट मध्ये साजरी होणारी दहीहंडी अर्थात गोपाळकाला वर्तकनगरमध्ये बुधवारी मोठया जल्लोषात सुरु होती. तोच उत्साह. तोच जल्लोष आणि ढोल ताशांच्या दणदणाटात दहीहंडी फोडणाऱ्या अवधूत गुप्ते दिग्दर्शित आणि विहंग प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या मराठी चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण हे वर्तकनगरच्या पोलीस वसाहतीमध्ये दिवसा आणि रात्रीच्या वेळी चित्रीत झाले आहे. गेल्या दोन आठवडयांपासून हे चित्रीकरण सुरु आहे. आणखी दोन दिवस चालणाऱ्याया चित्रीकरणातील महत्वाच्या टप्पाचा भाग बुधवारी चित्रीत झाला.
गोविंदा पथकांमधील वाद, संघर्षावरील चित्रपटात गोविंदा पथके कसे एकावर एक चार ते पाच थर रचतात याचे चित्रीकरण आहे. वैभव तत्ववादी याच्यासह अनेक कलाकार मंडळींचा यामध्ये समावेश आहे. शूटींग थेट आपल्या घराच्या गॅलरीतून पहायला मिळत असल्यामुळे या भागातील तरुण तरुणींमध्ये वेगळाच उत्साह पहायला मिळत होता.
काही स्थानिक तरुणांनाही दहीहंडीच्या ठिकाणी थर रचण्यासाठी काम मिळाल्यामुळे आपणही चित्रपटात दिसणार या कल्पनेने त्यांच्यातही वेगळाच सैराट जाणवत होता.
>‘काहे दिया परदेस’मधील नायकसोबत सेल्फी
केवळ चित्रपटाचीच नव्हे तर सध्या एका वाहिनीवर गाजत असलेली ‘काहे दिया परदेस..’ या मालिकेचेही अधून मधून याच भागात चित्रिकरण टीएमटीच्या बस थांब्यावर करण्यात येत असते. त्यामुळे या मालिकेतील नायकाबरोबर सेल्फी घेण्यासाठीही अनेक तरुणी गर्दी करतानाचे चित्रही पहायला मिळते. ठाणे महापालिकेकडून कोणताही वेगळा कर न आकारता शूटींगसाठी सहज परवानगी मिळत असल्यामुळे सध्या वर्तकनगर भाग चित्रीकरणासाठी चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
यापूर्वीही झेडा, बालक पालक, शाळा, टाईमपास अशा अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच भागात झालेले आहे. एकीकडे चित्रीकरणासाठी महापालिकेकडून कोणताही महसूल घेतला जात नाही. अशा प्रकारचा
महसूल जमा करण्याच्या दृष्टीने
पालिका प्रस्ताव विचाराधीन आहे. अशा प्रकारे प्रस्ताव तयार झाला तर पालिकेला चित्रीकरणाच्या माध्यमातून करोडोंचे उत्पन्न मिळू शकणार असल्याची प्रतिक्रीया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.