मुंबई: ठाकरे चित्रपट प्रदर्शित होईल, त्या दिवशी इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरेंनी दिला होता. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिवसेना आणि भाजपावर कडाडून टीका केली आहे. 'धमकी देण्याची शिवसेनेची हिंमत होतेच कशी? राज्यात गुंडांचं राज्य आहे का?' असे प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केले. अशा धमक्या देणाऱ्यांना तुरुंगात टाकायला हवं, अशी मागणीदेखील त्यांनी केली.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस असलेल्या बाळा लोकरेंनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. 'ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या तारखेला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही,' असं लोकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं. यासोबतच एका वृत्तवाहिनीशी बोलताना, या दिवशी दुसरा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाइलनं उत्तर देऊ, असा इशारादेखील दिला. यावरुन वाद निर्माण होताच शिवसेना खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. ते लोकरे यांचं वैयक्तिक मत असून ती शिवसेनेची भूमिका नाही, असं राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या स्पष्टीकरणानंतरदेखील हा वाद शमलेला नाही. अंजली दमानियांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कारवाईची मागणी केली आहे. गृह मंत्रालय, महाराष्ट्र पोलीस या प्रकरणी कारवाई करणार का? राज्यात गुंडांचं राज्य आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 'ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. याच दिवशी कंगना रानौतचा मणिकर्णिका आणि इम्रान हाश्मीचा चीट इंडियादेखील प्रदर्शित होणार आहे. त्या दिवशी इतर कोणतेही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी देणारा लोकरे कोण? ' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.