“अल्पावधीत ठाकरेंनी कोकणाला भरभरून दिले”; उद्धवसेनेच्या नेत्याने यादीच वाचून दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:09 IST2025-04-12T17:06:24+5:302025-04-12T17:09:02+5:30

Uddhav Thackeray Group News: उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यास कोकणातील जनता आणि शिवसैनिक सक्षम आहे, असे प्रत्युत्तर ठाकरे गटातील नेत्यांनी नारायण राणेंना दिले आहे.

thackeray group vaibhav naik replied bjp narayan rane over criticism on uddhav thackeray | “अल्पावधीत ठाकरेंनी कोकणाला भरभरून दिले”; उद्धवसेनेच्या नेत्याने यादीच वाचून दाखवली

“अल्पावधीत ठाकरेंनी कोकणाला भरभरून दिले”; उद्धवसेनेच्या नेत्याने यादीच वाचून दाखवली

Uddhav Thackeray Group News: केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासह नितेश राणे आणि निलेश राणे ठाकरे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राणे कुटुंबीय आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरूच असल्याचे पाहायला मिळते. यातच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी काय केले, याची एक यादीच वाचून दाखवली.

कोकणातील माणसांनी उद्योगधंदे करावेत हा प्रयत्न आम्ही करत आहोत. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशांची आकडेवारी जरा मागवा. ते कोकणात येणारही नाही, नाहीतर मी तुम्हाला आकडेवारी देईन. त्यांनी किती पैसे सिंधुदुर्गला दिले? असाही खडा सवाल करत, कोकणात उद्धव ठाकरे येतात, ते फक्त मासे मटण वडे खाण्यापुरतेच येतात, म्हणून मी येथील व्यवसायिकांना सांगितले आहे. ते येणार असतील, त्या दिवशी मटण वडे, मासे बंद ठेवा, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली होती. याला आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी रोखठोक शब्दांत उत्तर दिले आहे.

अल्पावधीत उद्धव ठाकरेंनी कोकणाला भरभरून दिले

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांना कालावधी कमी मिळाला. परंतु, कोरोना काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज उद्धव ठाकरेंनी मंजूर केले. ते आता प्रत्यक्षात सुरू झाले आहे. जेव्हा भयानक वादळ झाले होते, त्यावेळी स्वतः नारायण राणे केंद्रीय मंत्री होते. केंद्राची मदत येणार असे त्यांनी सांगितले होते. परंतु, फुटकी दमडी आली नाही आणि याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वादळाच्या वेळी कोट्यवधी रुपयांची मदत मच्छीमारांना तसेच शेतकऱ्यांना केली आहे. याच उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. चिपीसारखे विमानतळ सुरू केले, ज्याचे उद्घाटनही उद्धव ठाकरे यांनीच केले. ते तुम्हाला चालविता येत नाही, असा पलटवार वैभव नाईक यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यास कोकणातील जनता सक्षम

तुम्ही अनेक वर्षे मंत्री होतात, मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करणे आपल्याला जमले नाही. या महामार्गाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांनी केले, जे काम संपत आलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी थोड्याच कालावधीमध्ये कोकणासाठी भरभरून दिले आहे आणि त्यांचा पाहुणचार करण्यास आम्ही सक्षम आहोत. तुम्ही सत्तेत आहात तर निश्चितपणे एवढा माज सत्तेचा आणू नका. उद्धव ठाकरे येतील त्यावेळी कोकणातील जनता त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. कारण त्यांनीच तुमच्यासकट अनेक लोकांना पदे दिली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची, त्यांच्या पाहुणचाराची मुळीच काळजी करू नका. उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यास कोकणातील शिवसैनिक आणि जनता सक्षम आहे, असे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आपण मंत्री झालात हे जनतेच्या विकासासाठी झाला आहात. ज्या भाजपाने मंत्री केले, त्या भाजपाला सवाल आहे की, यांना सातत्याने पक्ष फोडण्यासाठी, आपल्या पक्षात आले तर विकासनिधी देण्यासाठी, बदला घेण्यासाठी यांना मंत्री केले काय? आपण मंत्री झाला तर लोकांची कामे करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सातत्याने गरळ ओकताय आणि त्याचा हिशेब जनता येत्या काळात करेल. जनताच त्याचा बदला घेईल. अशा धमक्यांना भीक घालणार नाही, या शब्दांत वैभव नाईक यांनी राणेंना उत्तर दिले.

 

Web Title: thackeray group vaibhav naik replied bjp narayan rane over criticism on uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.