Thackeray Group And Sharad Pawar Group: मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केला. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत जशा वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या, तशाच आता महापालिका निवडणुकांतही होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असतील, आम्ही त्यांच्यासोबत नाही, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.
मीडियाशी बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सचिन अहिर यांनी याबाबत थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी बैठक होणार आहे. विधानसभेचे सत्र सुरू असताना आमची चर्चा सुरू होती. या चर्चेचा एक भाग म्हणून ते पुण्यात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. दोन्ही गटाचे प्रमुख नेते एकत्र येण्याच्या फॉर्म्युलावर चर्चा करणार आहेत. मुंबईतही शरद पवार गटाची आमच्यासोबत लढण्याची मानसिकता आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे किंवा जयंत पाटील त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आता प्राथमिक चर्चा सुरू आहे. रविवारी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक होणार आहे. त्यामध्ये याला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे, असे सचिन अहिर यांनी सांगितले.
दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही
या बैठकांमध्ये मनसे पदाधिकारी सहभागी असणार का, यावर बोलताना सचिन अहिर म्हणाले की, मनसेसोबत आमची चर्चा सुरू आहे. मनसेला किती जागा द्यायच्या, कोणी कोणत्या जागा लढवायच्या याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यांना सोबत घेऊनच मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत बोलणी सुरू आहेत. पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना सचिन अहिर म्हणाले की, ते एकत्र आले, तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत जायचे असेल, तर त्यांनी आधी वरचा पाठिंबा काढावा. त्यातून बाहेर पडावे. पुढे काय करणार, हे त्यांनी स्पष्ट करावे. राज्यामध्ये आम्ही एक लढाई लढायची आणि स्थानिक पातळीवर ताळमेळ करायचा आणि साटेलोटे करायचे, हे चालणार नाही, असे सचिन अहिर यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, मनसे, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्रितपणे चर्चा करणार का, या प्रश्नावर बोलताना सचिन अहिर यांनी सांगितले की, वेळ पडल्यास तीनही पक्ष एकत्र बसून चर्चा करावी लागेल. कारण युती म्हटल्यावर एकत्रित बोलणी करावी लागतील, असेही अहिर म्हणाले.
Web Summary : Thackeray group opposes aligning with Sharad Pawar's NCP if it merges with Ajit Pawar's faction. MNS discussions continue for Mumbai, Pune, and Pimpri-Chinchwad elections. Three-party talks possible.
Web Summary : ठाकरे गुट ने शरद पवार की NCP के साथ गठबंधन का विरोध किया अगर वह अजित पवार के गुट के साथ विलय करती है। मुंबई, पुणे और पिंपरी-चिंचवड चुनावों के लिए MNS के साथ चर्चा जारी है। तीन-पक्षीय वार्ता संभव।