“कितीही त्रास होऊ दे, अटक झाली तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही”: राजन साळवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 13:19 IST2024-01-09T13:19:16+5:302024-01-09T13:19:45+5:30
Shiv Sena Thackeray Group News: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास राजन साळवींनी व्यक्त केला.

“कितीही त्रास होऊ दे, अटक झाली तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही”: राजन साळवी
Shiv Sena Thackeray Group News: राज्यातील राजकारण विविध मुद्द्यांवरून तापल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडी पथकाने धाड टाकली आहे. तर, आमदार अपात्रतेप्रकरणी १० जानेवारी रोजी निकाल येणार आहे. यातच ठाकरे गटाचे आणखी एक नेते राजन साळवी यांची एसीबी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना, कितीही त्रास होऊ दे, अटक झाली तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असा ठाम निर्धार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशी होणार आहे. वैद्यकीय कारणास्तव राजन साळवी यांच्या वहिनी चौकशीला गैरहजर राहणार आहेत. साळवी यांचे बंधू आणि पुतण्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. त्याचवेळी त्यांच्यासोबत स्वतः राजन साळवीही उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेतच राहणार कुठेही जाणार नाही
माझी आणि माझ्या कुटुंबीयांची एसीबी चौकशी आहे. भविष्यात कितीही त्रास झाला, अटक झाली, तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार कुठेही जाणार नाही, असे राजन साळवी यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले. तसेच आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, हा आम्हाला विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले निर्णय पाहता, त्यामध्ये केलेले उल्लेख पाहता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमच्या बाजूने निर्णय देतील, असा दावा राजन साळवी यांनी केला.
दरम्यान, राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. राजन साळवींनी आतापर्यंत तीनवेळा एसीबी कार्यालयात हजेरी लावली आहे. एसीबीकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचे मूल्यांकन करण्यात आले. घर आणि हॉटेलचे क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंगसाठी करण्यात आलेला खर्च यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.