Sanjay Raut News: एकीकडे आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत असून, दुसरीकडे देशाच्या राजकारणातही काही घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प यांची कथित मध्यस्थी अशा मुद्द्यांवरून विरोधक केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे सुरू असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत मोठे भाकित केले आहे.
संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राष्ट्रपतींना पंतप्रधान भेटणे हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे. ते राष्ट्रपतींना भेटायला जातात हेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रपतींना ते भेटायला बोलवत नाही. या देशात सध्याच्या कामाची एकंदरीत परिस्थिती पाहता काहीही होऊ शकते, असे संजय राऊत यांनी सांगितले.
सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्त्वाची बैठक आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या बैठकीत महत्त्वाच्या भविष्यातील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. जे सातत्याने सांगितले जात आहे की, सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. आम्हालाही वाटते की, सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असा दावा संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, सध्या सरकारमध्ये सर्वात समजदार मंत्री नितीन गडकरी आहेत. गडकरींच्या समजदारीला सलाम करतो. नेहरूंचे नाव घेतले म्हणून त्यांच्यावर कारवाई तर होणार नाही ना? नेहरूंचा किती द्वेष असावा. मुंबईतील मेट्रो स्टेशनला सायन्स सेंटर नाव दिले आहे, तेथून नेहरूंचे नाव काढले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हटले नाही, तर तेथील मेट्रो स्टेशनला राष्ट्रीय उद्यान म्हटले आहे, असे सांगत संजय राऊतांनी टीका केली.