“२५ वर्षे आमचे चांगले संबंध, आम्ही शत्रू नाही”; अंबादास दानवे इम्तियाज जलील यांना भेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:46 IST2025-04-04T13:45:20+5:302025-04-04T13:46:57+5:30
Thackeray Group Leader Ambadas Danve Meet Imtiyaz Jaleel: अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

“२५ वर्षे आमचे चांगले संबंध, आम्ही शत्रू नाही”; अंबादास दानवे इम्तियाज जलील यांना भेटले
Thackeray Group Leader Ambadas Danve Meet Imtiyaz Jaleel: राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
सातत्याने आमच्या भेटीगाठी होत असतात. गेल्या २५ वर्षांपासून आमचे चांगले संबंध आहेत. मागील २५ वर्षांपासून सातत्याने मी जलील यांच्या घरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आलेलो आहे. राजकीय चर्चेत मला काही देणेघेणे नाही. इम्तियाज जलील हे पण माझ्या घरी दिवाळीसाठी येत असतात, असे सांगतानाच माणूस चंद्रावर जाऊन पोहचला आहे. आताचे AI चे युग असून, भाजपाचे लोक हिंदू-मुस्लिम घेऊन बसले आहेत. राजकीय संबंधांइतकेच वैयक्तिक संबंधही महत्त्वाचे आहेत, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
आम्ही शत्रू नाहीत
लोकशाहीत विविध राजकीय पक्षांचे मतभेद असायला पाहिजे. मात्र, महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती असून, आपण सण उत्सव एकमेकांच्या घरी जाऊन साजरा करत असतो. माझी आणि अंबादास दानवे यांची ओळख महाविद्यालयीन जीवनापासून आहे. दरवर्षी मी दिवाळीला त्यांच्या घरी जात असतो. ईदला ते माझ्या घरी येत असतात. आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने असे वातावरण तयार करण्यात आले आहे की, हिंदू-मुस्लिम एकमेकांचे शत्रू आहेत. अंबादास दानवे आणि आमची राजकीय विचारसरणी वेगवेगळी असली तरीही आम्ही शत्रू नाहीत, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरून आता चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.