ठाकरे गटाला पुन्हा धक्का! अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत; उपमुख्यमंत्र्यांची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 21:27 IST2025-01-09T21:23:29+5:302025-01-09T21:27:20+5:30
Shiv Sena Shinde Group News: विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीला विजयी करायचे आहे, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला.

ठाकरे गटाला पुन्हा धक्का! अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत; उपमुख्यमंत्र्यांची टोलेबाजी
Shiv Sena Shinde Group News: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा मोठा पराभव झाला. यानंतर आता ठाकरे गटाकडून मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यातच ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी यांची गळती सुरूच आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.
ठाकरे गटाच्या तसेच महाविकास आघाडीतील ठाणे, भिवंडी, शहापूर, पालघर, अहिल्यानगर, अकोला, सोलापूर, वाडा, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच टोलेबाजी केली. ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आप अशा सगळ्याच पक्षांनी आता एकच रस्ता धरला आहे आणि तो म्हणजेच धनुष्यबाणाची शिवसेना. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचाराचा हा धनुष्यबाण आहे. या शिवसेनेत कुणीही मालक आणि नोकर नसून ही शिवसेना कार्यकर्त्यांची आहे, असे उपमुख्यमंमत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे
विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, असा निर्धारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला. काहीजण म्हणत होते की, सुप्रीम कोर्ट झाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ. विधानसभा निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची हे जनतेने ठरवले. काही जणांना स्वप्न पडले होते. त्यांनी मंत्रिमंडळही तयार केले होते. हॉटेलही बुक केले होते. पण, जनतेने आणि लाडक्या बहिणींनी त्यांचे बुकिंग रद्द केले, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार स्थापन केले. विकासाबरोबरच कल्याणकारी योजना राबविल्या. यामुळे महायुतीचा बहुमताने विजय झाला. लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी, युवक, ज्येष्ठ अशा सर्वांनी भरभरून मतांचा वर्षाव केला आणि मी सांगत होतो, त्याप्रमाणे विरोधक चीतपट झाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि मी असे आम्ही दोघे दोनशे आमदार निवडून आणू नाही तर गावाला शेती करायला जाऊ. पण आम्ही दोघांनी २३२ आमदार निवडून आणले. निवडणुकीत लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना त्यांची जागा दाखवली आणि घरी बसणाऱ्यांना घरीच बसून टाकले. फेसबुक लाइव्ह करणाऱ्या फेसबुक लाईव्ह करायला पाठवून दिले. राज्यातील २ कोटी ३९ लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ओळख मिळाली असून ती कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन असे मी म्हणायचो. आता उपमुख्यमंत्री असताना डिसीएम म्हणजेच डेडीकेटेड टू कॉमन मॅन, असे मी म्हणतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.